अंडरवर्ल्ड रिपोर्टर ते राज्यसभा खासदारकीचा प्रवास उलगडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 11:00 PM2020-01-11T23:00:00+5:302020-01-11T23:00:02+5:30

‘संजय उवाच’ - लोकमत पत्रकारिता पुरस्काराची उत्सुकता शिगेला

Underworld reporter to Rajya Sabha MP travel will be exposed | अंडरवर्ल्ड रिपोर्टर ते राज्यसभा खासदारकीचा प्रवास उलगडणार

अंडरवर्ल्ड रिपोर्टर ते राज्यसभा खासदारकीचा प्रवास उलगडणार

Next
ठळक मुद्देराज्यसभेत खासदार म्हणूनही त्यांची कारकीर्द ठरली लक्षणीय सर्वसामान्य नागरिकांसाठीही रंजक असणारा हा वैविध्यपूर्ण प्रवास मुलाखतीतून उलगडणार

पुणे : राज्यात आणि पुण्यात सर्वाधिक वाचकसंख्या असणाऱ्या ‘लोकमत’तर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रकारिता पुरस्काराची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. येत्या बुधवारी (दि. १५) तारखेला पुण्यात होणाऱ्या या पुरस्कार प्रदान सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांची मुलाखत हे या सोहळ्याचे खास आकर्षण असणार आहे. अंडरवर्ल्ड रिपोर्टर म्हणून कारकिर्द सुरु करुन राज्यसभेच्या खासदारकीपर्यंत पोहोचलेले राऊत हे स्वत: ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांचा हा वैशिष्टपूर्ण प्रवास त्यांच्या मुलाखतीमधून उलगडणार आहे. 
लोकमत संपादकीय मंडळाचे अध्यक्ष विजय दर्डा, एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा हे स्वत: पुण्यातील पत्रकारांच्या गौरवासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत. या सह पुण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, व्यापार आदी क्षेत्रातील दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. टिळक स्मारक मंदिरात सकाळी अकरा वाजता हा सोहळा रंगणार आहे. 
मुंबईतील गँगवॉर, भाईगिरी, अंडरवर्ल्डशी संबंधित रक्तपात, धमक्या, गुन्हेगारीचे वार्तांकन करत राऊत यांनी मराठी पत्रकारितेत स्थान निर्माण केले. त्यानंतर अगदी कमी वयात त्यांनी थेट ‘सामना’च्या कार्यकारी संपादकपदी झेप घेतली. त्यावेळी संपादक बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘ठाकरी’ मार्गदर्शनाखाली त्यांची पत्रकारिता बहरत गेली. राज्यसभेत खासदार म्हणूनही त्यांची कारकीर्द लक्षणीय ठरली आहे. केवळ पत्रकारांसाठीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही रंजक असणारा हा वैविध्यपूर्ण प्रवास राऊत यांच्या मुलाखतीतून उलगडणार आहे.  त्याच बरोबर पुण्यातील सर्व माध्यमांमधील दर्जेदार पत्रकारांची बातमीमागची धडपड समजून घेण्याचीही संधी या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने पुणेकरांना मिळणार आहे. 
..................
* पुण्यातील पत्रकारांसाठी पहिल्यांदाच ‘लोकमत’ची स्पर्धा 
शोधपत्रकारितेतून समाजाचा आरसा बनलेले, नागरी प्रश्नांना भिडून शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील असणाºया तसेच महिलाविषयक प्रश्न मांडून स्त्रीसक्षमीकरणाची चळवळ पुढे नेणाऱ्या पुण्यातील पत्रकारांसाठी ‘लोकमत’ने स्पर्धा आयोजित केली आहे. प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक असणारी या प्रकारची भव्य जिल्हास्तरीय स्पर्धा पहिल्यांदाच राज्यात होत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सर्व दैनिकांमधी तसेच वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार-छायाचित्रकारांनी या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला आहे.

विविध सात गटांसाठी या पत्रकार-छायाचित्रकारांनी मोठ्या संख्येने बातम्या आणि छायाचित्रे पाठवली आहेत. यांचे परिक्षण आनंद आगाशे, अरविंद व्यं. गोखले, विनिता देशमुख, अभय टिळक आणि विश्राम ढोले या ज्येष्ठ संपादक-पत्रकारांचे ‘ज्युरी’ मंडळ करणार आहे. विजेत्यांची नावे पंधरा तारखेच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात येणार असून त्याचवेळी पुण्यातील दिग्गजांच्या हस्ते त्यांचा गौरव केला जाणार आहे. या शिवाय, पत्रकारितेच्या क्षेत्रात आयुष्यभर झोकून काम केलेल्या पुण्यातील ज्येष्ठ पत्रकारालाही ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने गौरविण्यात येणार आहे. 

Web Title: Underworld reporter to Rajya Sabha MP travel will be exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.