अक्षय तृतीया, आंबा महोत्सवानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 15:17 IST2026-04-19T15:17:41+5:302026-04-19T15:17:56+5:30
- दगडूशेठ गणपती परिसरात विशेष नियोजन; सकाळपासून वाहतूक वळवण्यात येणार

अक्षय तृतीया, आंबा महोत्सवानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल
पुणे : अक्षय तृतीया आणि आंबा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक शाखेकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.
विशेषतः श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात गर्दी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. १९) सकाळी ७ वाजल्यापासून गर्दी ओसरेपर्यंत शिवाजी रोड, लक्ष्मी रोड आणि आसपासच्या भागातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.
अत्यावश्यक सेवा वगळता पीएमपी बस, चारचाकी तसेच जड वाहनांची वाहतूक वळवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही मार्गांवर बंदी घालण्यात येणार असून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---
वाहतूक बदल असे...
- शिवाजी रोडवरून स्वारगेटकडे जाणारी बस वाहतूक स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडमार्गे वळवण्यात येईल.
- पुणे मनपा भवनकडे जाणाऱ्या बसेस जंगली महाराज रोड-झाशी राणी चौकमार्गे जातील.
- आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील; ही वाहतूक बाजीराव रोडमार्गे वळवली जाईल.
- गणेश रोडकडे जाणाऱ्या काही बस मार्गांतही बदल करण्यात आले असून पर्यायी अंतर्गत मार्गांचा वापर केला जाईल.