अपघातामुळे वर्षात हजार विद्यार्थ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 17:11 IST2019-11-12T17:10:38+5:302019-11-12T17:11:32+5:30

राज्य शासनातर्फे गेल्या काही वर्षांपासून अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ‘ राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना ’राबविली जात आहे.

Thousands of students die each year due to accident | अपघातामुळे वर्षात हजार विद्यार्थ्यांचा मृत्यू

अपघातामुळे वर्षात हजार विद्यार्थ्यांचा मृत्यू

ठळक मुद्देप्राथमिक शिक्षण विभाग: शाळांना काळजी घेण्याच्या सूचना

पुणे: दरवर्षी राज्यातील शाळांमधील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांचा अपघाताने मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रामुख्याने वाहन अपघात, पाण्यात बुडून आणि साप चावल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू होत आहेत.त्यामुळे सर्व शाळांनी विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी,याबाबतच्या सूचना प्राध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे देण्यात आल्या आहेत.
राज्य शासनातर्फे गेल्या काही वर्षांपासून अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ‘ राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना ’ राबविली जात आहे. पूर्वी खासगी विमा कंपनी मार्फत अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुंटुंबियांना या योजनेंतर्गत आर्थिक मदत केली जात होती. परंतु, अपघातामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना २०११ पासून शासनाने स्वत: ७५ हजार रुपयांचा निधी देण्यास सुरूवात केली.तसेच अपघाताच्या तिव्रतेनुसार विद्यार्थ्यांना ५० ते ३० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. शासनातर्फे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात १ हजार ६९ तर २०१८-१९ या वर्षात १,१९० अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. त्यातील ८० टक्के विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर २० टक्के विद्यार्थ्यांना अपघात झाल्याने त्यांना अपंगत्व आले.
अपघातामुळे मृत्यू होणा-या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाने नुकतीच पुण्यातील गटशिक्षण अधिका-यांची बैठक घेतली. त्यात सर्व शाळांनी विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष द्यावे,अशा सूचना करण्यात आल्या. यंदा राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला असून सर्वत्र पाणी साठलेले आहे. तसेच शाळेच्या परिसरात गवत वाढले आहे. दिवाळीच्या सुट्टीमुळे बंद ठेवण्यात आलेल्या शाळांच्या वर्ग खोल्यांमध्ये व शाळा परिसरातील गवतामध्ये साप असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांना पाण्याचे आकर्षण असल्याने अनेक विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झालेला आहे. तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील शाळांमध्ये साप चावल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वी परिसरातील गवत काढून टाकावे, अशा सूचना शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.
अपघातामध्ये दोन डोळे किंवा दोन्ही गेल्यामुळे अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये तर एक डोळा किंवा हात निकामी झाल्यास विद्यार्थ्यांला ३० हजार रुपये अनुदान दिले जाते. रस्त्यावरील अपघातामुळे मृत्यूमुखी पडणा-या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे शाळांनी विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. रस्त्याचे नियम,पाणी,साप आदी बाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी,अशा सुचनाही प्राथमिक शिक्षण विभागाने शाळांना दिल्या आहेत.

Web Title: Thousands of students die each year due to accident