पुणे: यंदा शहरासह जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून, तापमानाने उच्चांक गाठला आहे. गेल्या आठ दिवसांत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून किमान तापमानही २९ अंशांच्या आसपास नोंदविले गेले आहे. ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
या पार्श्वभूमीवर औंध जिल्हा रुग्णालयासह सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी विशेष खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या कक्षांमध्ये थंड पाण्याची सुविधा, आयव्ही फ्लुइड्स, ऑक्सिजन, तापमान नियंत्रण उपकरणे आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध आहेत. उष्माघाताची लक्षणे दिसताच तातडीने उपचार देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाची तीव्रता वाढली असून, मार्चमध्येही उष्णतेच्या झळा जाणविल्या. त्यामुळे संभाव्य उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले होते.
आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना दुपारी १२ ते ४ यावेळेत बाहेर पडणे टाळण्याचा, भरपूर पाणी पिण्याचा तसेच डोक्यावर संरक्षण ठेवण्याचा सल्ला दिला आहे. चक्कर येणे, अशक्तपणा, डोकेदुखी, मळमळ किंवा शरीराचे तापमान वाढणे ही उष्माघाताची प्रमुख लक्षणे असून, अशी लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
उष्माघाताची लक्षणे
चक्कर येणे, अशक्तपणा. जास्त घाम येणे किंवा घाम थांबणे. डोकेदुखी, मळमळ, उलट्या. शरीराचे तापमान वाढणे, बेशुद्ध पडणे.
उन्हात बाहेर पडताना काळजी घ्या
भरपूर पाणी प्या, डोक्यावर टोपी किंवा ओढणी वापरा. हलके व सैल कपडे घाला. दुपारी १२ ते ४ यावेळेत बाहेर पडणे टाळा. लिंबूपाणी, ताक, नारळपाणी प्या.
उन्हाचा तीव्रपणा लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी प्रत्येकी पाच खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी दुपारच्या वेळेत गरज असतानाच घराबाहेर पडावे. पुरेसे पाणी पिणे, उन्हात काम करताना विश्रांती घेणे आणि उष्माघाताची लक्षणे दिसताच तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत. - डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे
Web Summary : Pune temperatures exceed 40°C. Hospitals reserve beds for heatstroke patients, equipped with cooling facilities. Avoid midday sun, hydrate, and seek immediate treatment for heatstroke symptoms. Doctors advise precautions.
Web Summary : पुणे में तापमान 40 डिग्री सेल्सियस से अधिक। अस्पतालों में हीटस्ट्रोक रोगियों के लिए बिस्तर आरक्षित, शीतलन सुविधाओं से लैस। दोपहर की धूप से बचें, हाइड्रेटेड रहें और हीटस्ट्रोक के लक्षणों के लिए तत्काल उपचार लें। डॉक्टरों ने सावधानियों की सलाह दी।