राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकृतीच्या नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात दाखल झाले असून, त्यांच्यावर काही चाचण्या आणि फॉलोअप उपचार केले जात आहेत. त्यांच्या या प्रकृती अस्वास्थ्यामुळे बारामतीमधील त्यांचा आगामी महत्त्वाचा दौरा रद्द करण्यात आला आहे.
शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत बोलताना सूत्रांनी सांगितले की, ही केवळ नियमित तपासणी असून, त्यात कोणतीही गंभीर बाब नाही. यापूर्वी फेब्रुवारी २०२६ मध्ये सीनेतील संसर्ग आणि डिहायड्रेशनमुळे त्यांना पुण्याच्या रूबी हॉल क्लिनिकमध्ये दोनदा दाखल करण्यात आले होते. त्यातून ते पूर्णपणे सावरले होते. अलीकडेच त्यांनी व्हीलचेअरवरून राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली होती आणि दिल्लीत माध्यमांशी संवादही साधला होता. मात्र, डॉक्टरांनी त्यांना पुरेशा विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
बारामतीची 'सांगता' पवारांशिवाय
शरद पवार यांच्या हॉस्पिटलमधील वास्तव्यामुळे त्यांचा बारामती दौरा रद्द करावा लागला आहे. बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी प्रचार सांगता सभा ही राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र, शरद पवार यांची उपस्थिती या सभेला एक वेगळे वलय मिळवून देणार होती, ती आता लाभणार नाही.
दरम्यान, शरद पवार यांची मुलगी आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच त्यांच्या आरोग्याबाबत माहिती दिली होती. मागील वेळी रुग्णालयातून घरी परतल्यानंतर त्यांनी पवारांना काही दिवस विश्रांतीची गरज असल्याचे म्हटले होते. सध्या शरद पवार डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून, प्रकृतीत सुधारणा होताच ते पुन्हा एकदा आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्यात सक्रिय होतील, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.
बारामतीकरांसाठी लिहिली पोस्ट
या दरम्यान शरद पवार यांनी एक पोस्ट लिहिली आहे. यात ते म्हणाले, 'मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला. आता २०२६ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे एक लाडके व लोकप्रिय नेते स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी, अपघाती निधनाच्या शोकात्म पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणुक होत आहे.
या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते. दुर्दैवाने माझी प्रकृती बिघडल्याने मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावे लागले. डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित रहावे लागत आहे, हे मी अत्यंत व्यथित आणि खेदपूर्ण अंत:करणाने सांगू इच्छितो. माझ्यावर अथक प्रेम व विश्वास असलेले बारामतीचे नागरिक, मतदार व कार्यकर्ते मला समजुन घेतील याची मी खात्री बाळगतो.
आमच्या पक्षाने (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार) या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा जाहिर केला आहे. स्व. अजित पवार यांना ही एकप्रकारे आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजलीच आहे. माझे बारामतीमधील सर्व मतदारांना आवाहन आहे की, त्यांनी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी.
बारामतीमधील मतदार यांनी माझ्यावर प्रदीर्घ विश्वास ठेवलेला आहे. ते या आवाहनास प्रतिसाद देतील, असा मला विश्वास आहे. मतदानासाठी प्रत्यक्ष न येता निवडणुक आयोगाच्या विविध पर्यायांचा देखील मी तपास केला व विचारणा केली. परंतु ते पर्याय उपलब्ध नसल्याचे राज्याच्या निवडणुक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अखेर अतिशय व्यथित व जड अंत:करणाने मला मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय करावा लागला. या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करावे, असे मी बारामतीकरांना पुन्हा एकदा आवाहन करतो.धन्यवाद !'
Web Summary : Sharad Pawar is hospitalized for routine checkups, canceling his Baramati visit. He urged voters to support Sunetra Pawar in the by-election following Ajit Pawar's death, expressing regret for missing the vote due to health reasons.
Web Summary : शरद पवार नियमित जांच के लिए अस्पताल में भर्ती, बारामती दौरा रद्द। उन्होंने अजीत पवार के निधन के बाद उपचुनाव में सुनेत्रा पवार का समर्थन करने का आग्रह किया, स्वास्थ्य कारणों से वोट न दे पाने पर दुख जताया।