२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्यात २६ निष्पाप बळी गेल्यानंतर भारताने घेतलेला सूड आजही जागतिक राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. भारताने ७ मे २०२५ रोजी सुरू केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'नेपाकिस्तानमधीलदहशतवादी संघटनांच्या मुळावर घाव घातला आणि आज वर्ष उलटूनही लश्कर-ए-तैयबाचा हाफिज सईद आणि जैश-ए-मोहम्मदचा मसूद अजहर यांसारखे कुख्यात दहशतवादी आपल्याच देशात अंडरग्राउंड होण्यास भाग पडले आहेत.
'ऑपरेशन सिंदूर'ची धडाकेबाज कामगिरी
भारताने या ऑपरेशनमध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या भूमीवर असलेल्या दहशतवाद्यांच्या ९ प्रमुख ठिकाणांना लक्ष्य केले होते. यामध्ये लाहोरपासून ४० किमी अंतरावर असलेले लश्कर-ए-तैयबाचे २०० एकरांवरील मुख्य मुख्यालय 'मुरीदके' आणि जैश-ए-मोहम्मदचा गड असलेला बहावलपूरमधील 'जामिया मस्जिद सुभान अल्लाह' कॅम्पस पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आला. या हल्ल्यात मसूद अजहरच्या कुटुंबातील १० सदस्यांचा खात्मा झाल्याचे खुद्द अजहरने कबूल केले होते.
कुठे लपले आहेत हे दहशतवादी?
'ऑपरेशन सिंदूर'नंतर हाफिज सईद आणि मसूद अजहर यांच्या जगण्याचे ठिकाणच बदलले आहे. मसूद अजहरला बहावलपूरमधून हलवून गिलगिट-बालटिस्तानमधील स्कर्दूमध्ये २० दिवस सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याला सातत्याने सरकारी आणि खाजगी गेस्ट हाऊसमध्ये हलवण्यात येत आहे. दुसरीकडे, लाहोरच्या जोहर टाउनमध्ये राहणारा हाफिज सईद आता इस्लामाबादच्या दिशेने सरकला आहे. भारताच्या दहशतीमुळे आयएसआय या दोघांनाही सातत्याने रावळपिंडी, कराची आणि लाहोरमधील सुरक्षित घरांमध्ये शिफ्ट करत आहे.
पाकिस्तानची दुटप्पी भूमिका
आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढल्यावर पाकिस्तानने नेहमीप्रमाणेच पळवाट काढली आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जरदारी यांनी, मसूद अजहर पाकिस्तानमध्ये नाही, तर अफगाणिस्तानात पळून गेला असावा, असा दावा केला होता. मात्र, गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार, हे दोन्ही दहशतवादी अजूनही पाकिस्तानच्या सरकारी संरक्षण आणि आयएसआयच्या देखरेखीखाली आहेत. बिलावल भुट्टो यांनी त्यांना भारताकडे सोपवण्याची तयारी दर्शवली असली, तरी त्यांच्या या विधानावरून स्वतः दहशतवादी संघटनांमध्येच रोष असल्याचे दिसून आले आहे.
भारताची करडी नजर
'ऑपरेशन सिंदूर'ने दहशतवाद्यांच्या जाळ्याचे कंबरडे मोडले आहे. हे दोन्ही गुन्हेगार जरी पाकिस्तानच्या आश्रयाला असले, तरी भारताच्या सुरक्षा यंत्रणांची करडी नजर त्यांच्या प्रत्येक हालचालीवर आहे. या ऑपरेशनमुळे दहशतवाद्यांच्या मनात भारताचा धसका कायम असून, वर्ष उलटूनही हे दोन्ही सरगना उघडपणे समाजात वावरण्याचे धाडस करू शकलेले नाहीत. भारत आपल्या भूमीचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे या कारवाईने जगाला दाखवून दिले आहे.
Web Summary : A year after 'Operation Sindoor,' which targeted terrorist havens in Pakistan following a deadly attack, Hafiz Saeed and Masood Azhar remain in hiding, fearing Indian retaliation, despite Pakistani denials and protection.
Web Summary : घातक हमले के बाद 'ऑपरेशन सिंदूर' के एक साल बाद भी, हाफिज सईद और मसूद अजहर भारतीय जवाबी कार्रवाई के डर से पाकिस्तान में छिपे हुए हैं, भले ही पाकिस्तान इनकार करे और सुरक्षा दे।