Strictly action on agricultural officers who not follow discipline | दांडीबहाद्दर कृषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई करण्याचा आयुक्तांचा आदेश
दांडीबहाद्दर कृषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई करण्याचा आयुक्तांचा आदेश

ठळक मुद्देकृषी आयुक्तांचा निर्णय : वैद्यकीय, दीर्घ रजांवर राहणार बारकाईने लक्ष रजेचा अर्ज न देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात तत्काळ शिस्तभंग कारवाई प्रस्तावित होणार

विशाल शिर्के- 
पुणे : वैद्यकीय कारणाच्या नावाखाली अचानक रजा घेणारे... काही न सांगता गैरहजर राहणारे... अनधिकृतपणे दीर्घ काळ रजेवर जाणाऱ्या कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी घेतला आहे. अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला असून, दांडीबहाद्दरांची माहिती दरमहा आयुक्तालयाला पाठविण्यासही त्यांनी बजावले आहे.  
कृषी विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी अचानक गैरहजर राहत असल्याचे कृषी आयुक्तांच्या निदर्शनास आले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी अचानकपणे वैद्यकीय अथवा इतर सुट्ट्या घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्याचे आदेश २६ नोव्हेंबर २०१९ रोजी काढले आहेत. याशिवाय अनधिकृत गैरहजर राहणारे अधिकारी, वैद्यकीय कारणास्तव गैरहजर असलेले व दीर्घकालीन रजेवर असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची माहिती दरमहा पाठविण्याची सूचना केली आहे. अ, ब आणि क अशा श्रेणीत तीन वेगवेगळ्या तक्त्यांमधे ही माहिती संबंधित नियंत्रण अधिकाऱ्याला दरमहा पाठविणे सक्तीचे केले आहे. अशी माहिती आयुक्तांना सादर न केल्यास संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांवरदेखील शिस्तभंग कारवाईचा इशारा या परिपत्रकात दिला आहे. 
अनेक अधिकारी-कर्मचारी अनधिकृतपणे गैरहजर राहतात. कामावर रुजू झाल्यानंतर असे कर्मचारी-अधिकारी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करतात. अशा कर्मचारी-अधिकाऱ्यांना वैद्यकीय मंडळाकडे विलंबाने तपासणीसाठी पाठविले जाते. विलंबाने तपासणी झाल्याने वैद्यकीय मंडळदेखील त्यावर कोणताही अभिप्राय देऊ शकत नाही. तसेच, काही वेळा संबंधितांची वैद्यकीय रजा योग्य आहे की नाही हा अभिप्राय संबंधित मंडळाकडून घेतला जात नाही. त्यानंतर, अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रजा प्रकरणे अतिशय विलंबाने आयुक्तालयास प्राप्त होतात, असे निरीक्षण ही आयुक्तांनी नोंदविले आहे. त्या मुळे संबंधित अर्जावर योग्य निर्णय घेता येत नाही. तसेच, दोषी 
असलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 
पूर्वपरवानगी न घेता व वैद्यकीय कारणास्तव गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती एल-१ (अनधिकृत गैरहजेरी), एल-२ (वैद्यकीय रजा) व एल-३ (दीर्घकालीन रजा) या श्रेणीत सादर करावी. तालुकास्तरावरील माहिती जिल्हास्तरावर आणि जिल्हास्तरावरील एकत्रित माहिती संबंधित विभागात सादर करावी. त्यानंतर विभागीय कृषी सहसंचालकांनी संपूर्ण विभागाची माहिती श्रेणीनिहाय दरमहा आयुक्तालयाला सादर करावी, असे आदेशात म्हटले आहे. 
..........
कृषी आयुक्तांच्या महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे
कार्यालय नियंत्रण अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता गैरहजर राहिलेल्या अधिकारी-कर्मचारी यांना तत्काळ कळविण्यात यावे. त्याचा पाठपुरावा करावा.
वैद्यकीय कारणास्तव अधिकारी-कर्मचारी अनुपस्थित असल्यास त्यास तत्काळ वैद्यकीय मंडळाकडे तपासणीसाठी पाठवावे. त्यासाठी ६० दिवसांपर्यंत थांबण्याची आवश्यकता नाही.
वैद्यकीय कारणास्तव रजेचा अर्ज सादर केल्यानंतर नियंत्रण अधिकाऱ्यास त्याची खात्री नसल्यास संबंधितास वैद्यकीय मंडळाकडे तपासणीसाठी पाठवावे.
च्एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी अनधिकृतरीत्या गैरहजर राहिलेल्या, कळवूनही हजर न राहणाऱ्या आणि रजेचा अर्ज न देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात तत्काळ शिस्तभंग कारवाई प्रस्तावित होणार.  
............

Web Title: Strictly action on agricultural officers who not follow discipline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.