उत्तर जुन्नर तहानले; ‘एम.आय. टँक’साठी ग्रामस्थांचा जनआंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 13:17 IST2026-05-13T13:17:22+5:302026-05-13T13:17:35+5:30
Pune water shortage : गाव-वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे

उत्तर जुन्नर तहानले; ‘एम.आय. टँक’साठी ग्रामस्थांचा जनआंदोलनाचा इशारा
नारायणगाव : जुन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील कोपरे, मांडवे, मुथाळणे, जांभूळशी, काठेवाडी, माळेवाडी, कुडाळवाडी, हगवणे वस्ती, जोशीवाडी, पुताचीवाडी, गुडघेवाडी आदी गाव-वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिक, शेतकरी आणि शेतमजूर मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत.
एप्रिल-मे महिन्यात विहिरी, बोअरवेल, नद्या आणि ओढे कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाणी व चाऱ्याचा प्रश्नही तीव्र झाला आहे. ग्रामपंचायतींच्या विहिरींमध्ये पाण्याचा थेंबही उरलेला नसून खासगी विहिरींचीही अवस्था चिंताजनक झाली आहे.
या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध होताच खासदार अमोल कोल्हे यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेतली. त्यानंतर कोपरे, मांडवे, मुथाळणे आणि जांभूळशी येथील शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी माजी आमदार अतुल बेनके उपस्थित होते. परिस्थितीचा आढावा घेत मांडवी नदी उगम खोरे भागातील प्रलंबित ‘एम.आय. टँक’ प्रकल्पाबाबत येत्या १० ते १५ दिवसांत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर अद्याप ठोस तोडगा न निघाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “आम्हाला आमचे हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे,” अशी ठाम भूमिका घेत चारही गावांतील ग्रामस्थांनी जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.
मांडवी नदी उगम खोरे पाणी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यानंतर रास्ता रोको आंदोलन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, पुढील आठवड्यात तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांची भेट घेण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्या सोनाबाई दाभाडे, सरपंच रोहिणी माळी, काशिनाथ माळवे, मच्छिंद्र तळपे, भीमराव मुठे, ठमाजी कवठे, हौसाबाई काटे, राजू मुठे, उमेश माळी, शंकर माळी, सोनू कुडळ, ज्ञानदेव काठे, मनोहर बुळे, राहुल सोनवणे, महादू माळी, पुनाजी मुठे, मंगेश मडके, तुकाराम जोशी, बबन दाभाडे, ज्ञानदेव कवटे यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ‘एम.आय. टँक’ प्रकल्पासाठी तातडीने कार्यवाही करून पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.