भीमाशंकर–आहुपे खोऱ्यात पाण्याचा थेंबही आटला; आदिवासींवर दुष्काळाची भीषण झळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 13:05 IST2026-05-06T13:03:44+5:302026-05-06T13:05:00+5:30
- पावसाळ्यात तुडुंब भरणारे जलस्रोत उन्हाळ्यात पूर्णपणे कोरडे पडत असल्याने दीर्घकालीन जलव्यवस्थापनाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे.

भीमाशंकर–आहुपे खोऱ्यात पाण्याचा थेंबही आटला; आदिवासींवर दुष्काळाची भीषण झळ
तळेघर : “आख्खं आयुष्य गेलं पाणी टिपण्यात... आमच्या डोक्यावरचा हंडा कधी खाली उतरला नाही,” अशा केविलवाण्या शब्दांत भीमाशंकर परिसरातील तळेघर येथील आदिवासी महिलांनी आपली व्यथा मांडली. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील भीमाशंकर पाटण व आहुपे खोऱ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, जलस्रोत पूर्णतः आटल्याने नागरिकांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.
या भागातील विहिरी, शिवकालीन खडकातील टाक्या, बुडीत बंधारे, तळी, डव्हरी आदी सर्व जलस्रोत कोरडे पडले आहेत. उरलेले पाणीही दूषित झाल्याने साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. परिणामी, महिलांना दररोज दोन ते तीन किलोमीटर अंतर पार करत कूपनलिका व टाक्यांमधून रात्रभर पाणी भरावे लागत आहे. अनेकदा तासनतास प्रतीक्षा करूनही फक्त एक हंडा पाणी मिळते.
पाण्याअभावी जनावरांचेही हाल सुरू असून, पिण्याच्या पाण्यासाठी ती सैरावैरा भटकताना दिसत आहेत. “डिंभे धरण जवळ असूनही आमच्या वाट्याला पाणी का येत नाही?” असा संतप्त सवाल आदिवासी बांधव उपस्थित करत आहेत. निवडणुकांच्या वेळी दिली जाणारी आश्वासने उन्हाळ्यात मात्र हवेत विरून जात असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.
तालुक्यातील १५ गावे व ९५ वाड्यांसाठी आठ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, प्रत्यक्षात पश्चिम आदिवासी भागात अपुरा व अनियमित पुरवठा होत असून, टँकर व्यवस्थेत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामपंचायतींनी टँकरची मागणी करूनही प्रशासन व ठेकेदारांच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांची वणवण सुरूच आहे.
विशेष म्हणजे, भीमाशंकर-आहुपे परिसर हा मुसळधार पावसासाठी ओळखला जातो. पावसाळ्यात चार महिने सतत पाऊस पडूनही उन्हाळ्यात तीव्र टंचाई भासणे ही गंभीर बाब ठरत आहे. पावसाळ्यात तुडुंब भरणारे जलस्रोत उन्हाळ्यात पूर्णपणे कोरडे पडत असल्याने दीर्घकालीन जलव्यवस्थापनाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे.
माळीण, पोटेवाडी, झांजरेवाडी, कोकणेवाडी, लेंभेवाडी, पसारवाडी, तळेघर, आहुपे, नांदुरकीचीवाडी, जांभळवाडी, सावरली, गोहे बुद्रुक, बोरीचीवाडी, पाचवड, कोंढरे, दिगद, राजपूर, फुलवडे आदी गावांसह अनेक वाड्या-वस्त्यांतील नागरिक दुष्काळाच्या विळख्यात सापडले आहेत.
दरम्यान, “टँकरद्वारे पाणीपुरवठा योग्य प्रकारे होत आहे का, याची सखोल चौकशी करण्यात येईल,” अशी माहिती पंचायत समिती सभापती कैलास बुवा काळे यांनी दिली. दुष्काळाच्या या झळांमुळे आदिवासी भागातील जीवनमान ढासळले असून, पाण्यासाठीची ही संघर्षमय लढाई अजून किती दिवस चालणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.