पुणे जिल्ह्यात टंचाईशी लढण्यासाठी ३५.७४ कोटींचा कृती आराखडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 12:50 IST2026-05-13T12:50:33+5:302026-05-13T12:50:51+5:30
Pune water shortage :अनेक गावांमध्ये उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

पुणे जिल्ह्यात टंचाईशी लढण्यासाठी ३५.७४ कोटींचा कृती आराखडा
पुणे : पुणे जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने तब्बल ३५ कोटी ७४ लाख ९३ हजार रुपयांचा पूरक पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला असून, त्यास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंजुरी दिली आहे. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन हा आराखडा तयार करण्यात आला असून, टंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी दिली.
यापूर्वी दि. १ ऑक्टोबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीसाठी ३५ कोटी ६४ लाख ४० हजार रुपयांचा टंचाई निवारण आराखडा मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आता दि. १ एप्रिल २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीसाठी स्वतंत्र त्रैमासिक पूरक कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर नवनिर्वाचित सदस्यांनी ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत विविध सूचना प्रशासनाकडे मांडल्या होत्या. अनेक गावांमध्ये उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने पूरक टंचाई आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविला होता. आराखड्यानुसार नवीन विंधन विहिरी घेणे, नळपाणी योजनांची विशेष दुरुस्ती, पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण, प्रलंबित नळपाणी योजना पूर्ण करणे तसेच आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अशा विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. टंचाईग्रस्त गावांना तातडीने दिलासा देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही जगदाळे यांनी स्पष्ट केले.
उपाययोजनांसाठी निधीची तरतूद
नवीन विंधन विहिरी : १० कोटी १५ लाख २५ हजार
नळपाणी योजनांची विशेष दुरुस्ती : १२ कोटी २१ लाख ५१ हजार
विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती : १ कोटी ४० लाख १७ हजार
टँकरद्वारे पाणीपुरवठा : १ कोटी ४४ लाख ५० हजार
खाजगी विहिरींचे अधिग्रहण : २ कोटी ९२ लाख ७० हजार
विहिरी खोल करणे व गाळ काढणे : २६ लाख ८५ हजार
पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण : ७ कोटी २४ लाख
प्रगतीपथावरील नळपाणी योजना पूर्ण करणे : ९ कोटी ९५ लाख
“टंचाईग्रस्त गावांना प्राधान्याने मदत”
“जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून विविध उपाययोजना राबवून ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा दिला जाईल. आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचेही नियोजन करण्यात आले आहे,” असे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सांगितले.