१२ गावांतील पाणीप्रश्न सुटणार, शहरातील पुराचे संकटही टळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 10:44 IST2026-05-12T10:44:15+5:302026-05-12T10:44:40+5:30
- केंद्राची १ हजार २९० कोटींच्या निधीला मंजुरी; १२ गावांमधील पाणीपुरवठ्यासाठी ८९० कोटी, पूर नियंत्रणासाठी ४०० कोटी निधी

१२ गावांतील पाणीप्रश्न सुटणार, शहरातील पुराचे संकटही टळणार
पुणे :पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या १२ गावांमधील पाणी पुरवठ्यासाठी ८९० कोटी आणि शहरातील पावसाळी पाण्याचा निचरा आणि पूर नियंत्रणासाठी ४०० कोटींचा निधी, असा या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी १ हजार २९० कोटी रुपयांच्या निधीला केंद्र सरकारने अर्बन चॅलेंज फंडअंतर्गत मंजुरी दिली आहे. त्यामुळे समाविष्ट १२ गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. पुराचे संकट निवारण्यासही मोठी मदत होणार आहे.
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पहिल्या 'ॲपेक्स कमिटी'च्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रकल्पांचे प्रभावी सादरीकरण केले. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर उपस्थित होत्या.
या निधीमुळे पुणे शहराच्या पायाभूत सुविधांना मोठी गती मिळणार आहे. पुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीतील समान पाणीपुरवठा योजनेचे काम ८५ टक्के पूर्ण झाले असून, ऑगस्ट २०२६ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. त्याच धर्तीवर समाविष्ट १२ गावांसाठी ८९० कोटी रुपयांचा स्वतंत्र पाणीपुरवठा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यात खडकवासला, नांदेड, नांदोशी, सणसनगर, किरकीटवाडी, धायरी, नऱ्हे, जांभूळवाडी, कोल्हेवाडी, मांगडेवाडी, निंबाळकरवाडी, भिलारवाडी या गावांचा समावेश आहे. त्यामध्ये २०० एमलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प आणि ७१ किमी लांबीची जलवाहिनी टाकल्या जाणार आहेत. ९० किलोमीटरच्या जलवाहिनीचे वितरण जाळे उभारले जाणार आहे. स्मार्ट यंत्रणा: 'स्काडा' आणि 'एएमआर' आधारित स्मार्ट मीटरिंग प्रणालीद्वारे २०५२ पर्यंत ७ लाख ७८ हजार नागरिकांना शुद्ध पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
शहरातील पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी आणि पूर नियंत्रण मिळविण्यासाठी ४०० कोटी रुपयांच्या प्रकल्पास मान्यता मिळाली आहे. शहरातील महत्त्वाच्या ३३५ पूरग्रस्त ठिकाणी उपाययोजना केल्या जाणार आहे. त्यामध्ये नाला खोलीकरण आणि रुंदीकरण, कलव्हर्टसह विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत, अशी माहिती पालिकेच्या अतिरक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दिली.
या गावांचा पाणीप्रश्न सुटणार
खडकवासला, नांदेड, नांदोशी, सणसनगर, किरकिटवाडी, धायरी, नऱ्हे, जांभूळवाडी, कोल्हेवाडी, मांगडेवाडी, निंबाळकरवाडी आणि भिलारवाडी.