यंदाच्या आयपीएलमध्ये झोकात सुरुवात करून पहिल्या ७ पैकी ६ सामन्यात विजय मिळवणाऱ्या पंजाब किंग्सला सोमवारी रात्री झालेल्या अटीतटीच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. या लढतीत कर्णधार अक्षर पटेल, डेव्हिड मिलर, आशुतोश यांच्या स्फोटक फलंदाजीमुळे दिल्लीचा संघ विजय मिळवण्यात यशस्वी झाला. मात्र या तिघांसोबत दिल्लीच्या विजयात चमकलेल्या एका युवा अष्टपैलू खेळाडूनेही सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. हा खेळाडू म्हणजे माधव तिवारी.
अवघ्या २२ वर्षांचा असलेल्या माधव तिवारी याला काल पंजाब आणि दिल्लीत झालेल्या सामन्यापूर्वी फारसं कुणी ओळखत नव्हतं. मात्र सामना संपल्यापासून आता त्याच्याच खेळीची चर्चा होत आहे. अष्टपैलू माधवने या सामन्या गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये चमक दाखवत सामनावीराचा मान पटकवला.
या लढतीत माधव तिवारी याने सुरुवातीला ४ षटकांत ४० धावा देत दोन बळी टिपले. त्यानंतर २११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अखेरच्या अटीतटीच्या क्षणी ८ चेंडूत १८ धावा काढत दिल्लीला ३ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. या अष्टपैलू कामगिरी साठी माधवला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
२२ वर्षीय माधव तिवारी हा लोअर मिडल ऑर्डरमधील फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे माधव याने त्याचं राज्य असलेल्या मध्य प्रदेशकडून एकही प्रथमश्रेणी किंवा लिस्ट ए सामना खेळलेला नाही. मात्र मध्य प्रदेश प्रीमियर लीगमध्ये माधव हा भोपाळ लेपर्ड्स संघाकडून खेळला आहे. गतवर्षी अवघ्या ४० लाख रुपयांच्या बोलीवर दिल्ली कॅपिटल्सच्या संघात दाखल झालेल्या माधवने याआधी मुंबई इंडियन्सविरुद्ध एक सामना खेळला होता. त्या सामन्यात त्याला केवळ ३ धावाच काढता आल्या होत्या. तसेच त्याला गोलंदाजीची संधीही मिळाली नव्हती. मात्र काल पंजाबविरुद्ध त्याला संधी मिळाली आणि या संधीचं त्याने सोनं केलं.