Pune Temperature: प्रचंड उकाड्याने पुणेकर हैराण; तापमान ३९ ते ४० अंशांवर, आता संध्याकाळीही उष्णतेची धग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 12:31 IST2026-05-18T12:30:49+5:302026-05-18T12:31:00+5:30
Pune Temperature पुढील दोन ते तीन दिवस तापमानाची हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असून, दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहू शकते.

Pune Temperature: प्रचंड उकाड्याने पुणेकर हैराण; तापमान ३९ ते ४० अंशांवर, आता संध्याकाळीही उष्णतेची धग
पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा सातत्याने चढता-उतरता असून, सध्या पुण्याचे कमाल तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जात आहे. तापमानातील या वाढीसह हवेतील प्रचंड उकाड्यामुळे पुणेकर पुरते हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे, संध्याकाळी आल्हाददायक वाटणाऱ्या पुण्यात आता उष्णतेची धग सोसावी लागत आहे. रविवारी (दि.१७) पुणेकरांना गरम हवेचा चटका सहन करावा लागला.
सकाळपासूनच उन्हाचा चटका आणि धग जाणवत होती. रविवारी सकाळपासूनच शहरात सूर्यदेवाने रौद्ररूप धारण केले होते. सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या. दुपारच्या वेळी मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला, कारण नागरिकांनी उन्हापासून वाचण्यासाठी घरात किंवा कार्यालयातच थांबणे पसंत केले. दुपारच्या सुमारास तापमानाचा पारा चाळिशीच्या जवळ पोहोचल्याने अंगाची चांगलीच काहिली झाली. सायंकाळीही दिलासा मिळाला नाही.
नेहमीप्रमाणे सूर्यास्तानंतर तापमानात घट होऊन गारवा मिळेल, अशी आशा पुणेकरांना होती. मात्र, आज सायंकाळी देखील उकाडा अजिबात कमी झाला नाही. वारे संथ गतीने वाहत होते आणि अंगाला झोंबणाऱ्या गरम हवेच्या लाटांमुळे नागरिक घामाघूम झाले होते. रात्री उशिरापर्यंत कोंदट वातावरण आणि उकाडा कायम राहिल्याने पंखे आणि एसी असूनही नागरिकांना घरात राहणे कठीण झाले होते. शनिवार-रविवारची सुट्टी असूनही उकाड्यामुळे नागरिकांनी संध्याकाळी बाहेर पडणे टाळले.
भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार, अरबी समुद्राकडून येणाऱ्या आर्द्रतेमुळे आणि स्थानिक हवामानातील बदलांमुळे हा उकाडा वाढला आहे. पुढील दोन ते तीन दिवस तापमानाची हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असून, दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहू शकते.
डॉक्टरांचा काळजी घेण्याचा सल्लावाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. "उष्णतेच्या लाटेपासून आणि डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी नागरिकांनी भरपूर पाणी, लिंबू पाणी किंवा ताक प्यावे. हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावेत आणि दुपारच्या वेळी थेट उन्हात जाणे टाळावे," असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
रविवारचे कमाल तापमान
शिवाजीनगर : ३९.२
कोरेगाव पार्क : ३८.८
वडगावशेरी : ३८.२
चिंचवड : ३७.९
पाषाण : ३७.२
हडपसर : ३६.९