- अशोक काकडे लोहगाव : येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील स्वच्छतेचा कारभार आता भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चव्हाट्यावर आला आहे. मागील २० महिन्यांपासून स्वच्छतेची बिले जाणीवपूर्वक रोखल्याचा आणि त्या बदल्यात 'कमिशन' मागितल्याचा खळबळजनक आरोप लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेचे विजय कांबळे यांनी रुग्णालयाचे अधीक्षक श्रीनिवास कोलोड यांच्यावर केला आहे. इतकेच नव्हे, तर या जाचाला कंटाळून कांबळे यांनी सहकुटुंब आत्महत्येचा इशारा दिल्याने आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
लोकराज्य संस्थेकडे २०१७ पासून मनोरुग्णालयाच्या स्वच्छतेचे काम होते. कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, त्यांनी आजवर प्रामाणिकपणे सेवा दिली असून अनेक मंत्र्यांनी व न्यायाधीशांनी त्यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. मात्र, अधीक्षक श्रीनिवास कोलोड यांनी पदभार घेतल्यापासून कामात अडथळे निर्माण करण्यास सुरुवात केली.
कर्जाचा डोंगर आणि आत्महत्येची धमकी…
मी कामगारांचे पगार, ईएसआय आणि पीएफ स्वतः कर्ज काढून भरले आहेत, असे कांबळे यांनी नमूद केले. ३१ मार्च रोजी केवळ ३५ टक्के बिल काढण्यात आले, ज्यामुळे संस्थेवर कर्जाचा प्रचंड बोजा वाढला आहे. सांगलीतील कंत्राटदार हर्षवर्धन पाटील यांच्या आत्महत्येचा दाखला देत कांबळे म्हणाले की, प्रशासन आम्हाला आत्महत्येस प्रवृत्त करत आहे. जर आम्हाला न्याय मिळाला नाही, तर सहकुटुंब आत्महत्या करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही आणि त्याला सर्वस्वी अधीक्षक कोलोड जबाबदार असतील.
४५ डिग्री तापमानात होरपळत आहेत मनोरुग्ण..
तापमानाचा पारा वाढत आहे. अशात मनोरुग्ण असलेल्या वॅार्डात कूलर सोडा साधे फॅनसुद्धा नीट नाहीत. एकीकडे प्राणी संग्रहालयात जनावरांसाठी वॉटर फॉगर वापरले जात असताना टीनपत्रे असलेल्या वॉर्डात रुग्णांना भट्टीत टाकल्यासारखी परिस्थिती होत आहे. याकडे अधीक्षक, अधिकारी व कर्मचारी यांचे कुठलेही लक्ष नसून मनोरुग्णालयातील कारभार पूर्णतः ढेपाळला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणातील आरोपी..
येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत बडगिरे हे लातूरच्या सार्वजनिक आरोग्य विभागात मुख्य प्रशासकीय अधिकारी होते. ऑक्टोबर २०२१ साली आरोग्य विभागाच्या गट ‘ड’ पेपरफुटी प्रकरणी त्यांचा सहभाग होता. त्या प्रकरणात त्यांना अटक सुद्धा झाली होती. आज तेच अधीक्षक श्रीनिवास कोलोड यांच्या खांद्याला खांदा लावून मनोरुग्णालयाचा भ्रष्ट कारभार हाकत आहेत.
अधीक्षकांविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांकडून अनधिकृतपणे कामे करून घेणे, औषधांऐवजी व्यसनाधीन बनवणे आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे समोर आले आहे. शासनाकडून करोडो रुपयांचा निधी मिळूनही रुग्णांचे शारीरिक व मानसिक शोषण होत असल्याचा ठपका ठेवत, रोज वेगवेगळी प्रकरणे समोर येत असताना व रुग्णसेवेत असमर्थ ठरलेले अधीक्षक कोलोड सनद बोगस असू शकते. त्यामुळे चौकशीची सुरुवातच त्यांच्या सनदीपासून करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत साटोटे यांनी केली आहे. चौकशी करून अधीक्षक श्रीनिवास कोलोड यांच्या निलंबनाची मागणीही मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
Web Summary : Yerwada Mental Hospital faces corruption charges: Bills unpaid due to alleged commission demands. Contractor threatens suicide, citing financial strain and neglect of patients amid rising temperatures. Mismanagement and a tainted official exacerbate the crisis, prompting calls for investigation and suspension.
Web Summary : येरवदा मनोरोग अस्पताल में भ्रष्टाचार के आरोप: कथित कमीशन की मांग के कारण बिलों का भुगतान नहीं किया गया। ठेकेदार ने वित्तीय तनाव और बढ़ते तापमान के बीच रोगियों की उपेक्षा का हवाला देते हुए आत्महत्या की धमकी दी। कुप्रबंधन और एक कलंकित अधिकारी ने संकट को बढ़ा दिया, जिससे जांच और निलंबन की मांग की गई।