शेतकरी बळीराजाच्या हाकेला महावितरण धावून येईल का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 14:44 IST2026-04-19T14:44:37+5:302026-04-19T14:44:55+5:30
भारनियमन वेळ बदलण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी

शेतकरी बळीराजाच्या हाकेला महावितरण धावून येईल का ?
निरा नरसिंहपूर : इंदापूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपरी बुद्रूक ते नरसिंहपूर परिसरात संध्याकाळी ६ ते १० या वेळेत होणाऱ्या भारनियमनामुळे ग्रामीण भागातील उद्योग-धंदे तसेच सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांना मोठा त्रास होऊ लागला आहे. नरसिंहपूर, पिंपरी बुद्रूक, टणू, गिरवी, गणेशवाडी, शिंदेवस्ती, चव्हाण वस्ती, सुतार वस्ती, ओझरे, गोंदी, लुमेवाडी, लिंबुडी आणि आसपासच्या सर्व भागांतील शेतकरी चिंतेत आहेत.
गावठाण क्षेत्रातील नागरिकांना विजेचा पुरवठा नसल्यामुळे त्यांच्या मुलांना अंधारात अभ्यास करता येत नाही. संध्याकाळच्या वेळी शेतातील जनावरांच्या गोठ्यातही शेतकरी काम करू शकत नाहीत. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या लोडशेडिंगच्या त्रासाने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन नीरा आणि भीमा नदीकाठच्या गावांत चोरीचे प्रमाण वाढले आहे. संध्याकाळी सहा ते रात्री दहा या चार तासांच्या भारनियमनाला महावितरण विभागाने रद्द करावे, अशी मागणी तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. संध्याकाळचे भारनियमन रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून, छोटे-मोठे व्यावसायिक आणि उद्योजक यांनी केली आहे.
घरातील चोरीच्या घटना आणि नदीकाठच्या विद्युत पंप तसेच विहीर व बोर येथील विद्युत पंपांसह केबल्स चोरण्याच्या घटना वाढल्या आहेत. सध्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू असल्यामुळे गरीब आणि गरजू शेतकऱ्यांच्या मुलांना अभ्यास करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. उद्योजक आणि ग्रामस्थ त्यांच्याकडून भारनियमनाच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी करत आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळेल का? हा प्रश्न सध्या उपस्थित आहे.