हेल्मेट कुठंय ? सचिन तेंडुलकरांचा पुण्यात तरुणाला थेट सवाल; १० सेकंदांचा प्रसंग झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 16:54 IST2026-05-08T16:54:01+5:302026-05-08T16:54:48+5:30
- कोणताही स्टारडमचा आव न आणता, अगदी घरातील मोठ्या व्यक्तीप्रमाणे त्यांनी प्रेमाने सांगितले, “हेल्मेट नाही? गाडी सावकाश चालव…”

हेल्मेट कुठंय ? सचिन तेंडुलकरांचा पुण्यात तरुणाला थेट सवाल; १० सेकंदांचा प्रसंग झाला व्हायरल
पुणे - पुणे शहरातील गजबजलेल्या टिळक रस्त्यावर एका तरुणासाठी आयुष्यभर लक्षात राहील असा भावनिक क्षण घडला. क्रिकेटविश्वातील महान फलंदाज आणि करोडो भारतीयांच्या हृदयातील ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकर यांची अचानक भेट झाल्याने सोहम मरगजे हा तरुण भारावून गेला. मात्र या भेटीचं खास वैशिष्ट्य म्हणजे सचिन यांनी दिलेला सुरक्षिततेचा मोलाचा संदेश दिला.
एस.पी. कॉलेज चौकात सिग्नल लागल्यामुळे वाहतूक थांबली होती. बाजूला उभ्या असलेल्या रेंज रोव्हर गाडीची काच खाली झाली आणि आतून एक शांत, आपुलकीचा आवाज आला, हेल्मेट कुठे ? क्षणभर सोहमला विश्वासच बसला नाही. कारण समोर स्वतः सचिन तेंडुलकर उभे होते. कोणताही स्टारडमचा आव न आणता, अगदी घरातील मोठ्या व्यक्तीप्रमाणे त्यांनी प्रेमाने सांगितले, “हेल्मेट नाही? गाडी सावकाश चालव…”
सचिन तेंडुलकर यांचे हे शब्द काही सेकंदांत संपले, पण सोहमच्या मनात कायमचे कोरले गेले. त्या क्षणी त्याने सचिन यांच्यासोबत सेल्फी घेतला, मात्र त्याहून मोठी आठवण ठरली ती त्यांच्या काळजीची. या अनुभवाबद्दल बोलताना सोहम म्हणाला, क्रिकेटचा देव भेटला, ही आनंदाची गोष्ट होतीच. पण जाताना त्यांनी आयुष्य जपण्याची आठवण करून दिली. त्या एका वाक्यात माया, काळजी आणि प्रेरणा होती. या घटनेनंतर सोहमने हेल्मेट नियमित वापरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर हा प्रसंग वेगाने व्हायरल होत असून पुणेकरांकडून सचिन यांच्या साधेपणाचं आणि माणुसकीचं मोठं कौतुक केलं जात आहे.