घाईगडबडीत शस्त्रक्रिया, रुग्णांच्या जीवाशी खेळ? ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील त्रुटी उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 11:01 IST2026-04-29T11:00:52+5:302026-04-29T11:01:34+5:30

- घाईघाईत शस्त्रक्रिया रुग्णांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप

pune news Shortage of doctors, increasing numbers and lack of facilities | घाईगडबडीत शस्त्रक्रिया, रुग्णांच्या जीवाशी खेळ? ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील त्रुटी उघड

घाईगडबडीत शस्त्रक्रिया, रुग्णांच्या जीवाशी खेळ? ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील त्रुटी उघड

पुणे: कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांची कमतरता, वाढती रुग्णसंख्या आणि अपुऱ्या सुविधा यामुळे ग्रामीण भागातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र समोर आले आहे. दौंड तालुक्यातील केडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रियेनंतर २२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर हा गंभीर मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर तिच्या पोटात रक्तस्त्राव सुरू झाला आणि रक्तदाब झपाट्याने कमी झाला. प्रकृती गंभीर झाल्याने तिला प्रथम खासगी रुग्णालयात आणि नंतर पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबनियोजन शस्त्रक्रियांच्या प्रक्रियेतील त्रुटींवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आरोग्य विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, ग्रामीण भागात आयोजित शिबिरांमध्ये नियमांचे पालन होत नसल्याचे वास्तव समोर येत आहे. वास्तविक, एका शिबिरात २५ ते ३० शस्त्रक्रिया करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४० ते ५० शस्त्रक्रिया केल्या जातात. इतकेच नव्हे, तर काही शल्यविशारद एका दिवसात दोन ते तीन ठिकाणी जाऊन शस्त्रक्रिया करत असल्याची माहिती समोर आली आहे. या घाईगडबडीत रुग्णांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

नियम काय सांगतात?

- एका दिवसात जास्तीत जास्त ३० शस्त्रक्रिया करणे आवश्यक
- शल्यविशारद, परिचारिका आणि भूलतज्ज्ञांची उपस्थिती अनिवार्य
- भूल उतरेपर्यंत भूलतज्ज्ञाने उपस्थित राहणे आवश्यक
- सर्व शस्त्रक्रिया शस्त्रक्रियागृहातच करणे बंधनकारक
- बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेनंतर किमान एक दिवस विश्रांती आवश्यक
- टाके असलेल्या शस्त्रक्रियेनंतर ५ ते ७ दिवस देखरेख आवश्यक

प्रत्यक्षात परिस्थिती उलट

ग्रामीण भागातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे प्रत्यक्षात दिसून आले आहे. दोन ते तीन शिबिरांमध्ये एकच डॉक्टर शस्त्रक्रिया करत असून, आवश्यक कर्मचाऱ्यांची कमतरता दिसते. याशिवाय शस्त्रक्रिया झाल्यानंतर संबंधित डॉक्टर तत्काळ त्या ठिकाणाहून निघून जातात. गुंतागुंत झाल्यास उच्चस्तरीय उपचारांची कमतरतादेखील जाणवते. तसेच शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना आवश्यक विश्रांती न देता लगेच घरी पाठविले जाते.

 

Web Title : जल्दबाजी में सर्जरी से जान जोखिम में; ग्रामीण स्वास्थ्य सेवा में कमियाँ उजागर।

Web Summary : सर्जरी के बाद एक महिला की मौत ने ग्रामीण परिवार नियोजन शिविरों में उल्लंघनों का खुलासा किया। अत्यधिक व्यस्त कार्यक्रम, अपर्याप्त स्टाफिंग और पश्चात की देखभाल की अनदेखी रोगियों को खतरे में डालती है। दिशानिर्देशों का उल्लंघन किया जाता है, डॉक्टर शिविरों के बीच जल्दबाजी करते हैं, सुरक्षा से समझौता करते हैं और आवश्यक आराम और निगरानी की उपेक्षा करते हैं।

Web Title : Hasty surgeries jeopardize lives; rural healthcare flaws exposed.

Web Summary : A woman's death post-surgery unveils violations in rural family planning camps. Overbooked schedules, inadequate staffing, and neglected post-operative care endanger patients. Guidelines are flouted, with doctors rushing between camps, compromising safety and neglecting necessary rest and monitoring.