ओतूर ( पुणे जि.) - जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा धरणाच्या मुख्य कालव्याला मंगळवारी पहाटे मोठे भगदाड पडून कालवा फुटल्याची गंभीर घटना घडली. धरणापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आणि अनेक पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास कालवा फुटताच पाण्याचा जोरदार प्रवाह शेतजमिनीकडे वळला. अवघ्या काही मिनिटांत धना, टोमॅटो, मिरची, ऊस आणि बाजरीची पिके पाण्याखाली गेली. अनेक ठिकाणी सुपीक माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक शेतकरी संतोष निमसे यांनी तातडीने धरण प्रशासनाशी संपर्क साधत पाणी बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर पाटबंधारे विभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. सुमारे अर्धा तास प्रयत्न केल्यानंतर कालव्याचे पाणी बंद करण्यात यश आले. त्यावेळी कालव्यातून तब्बल २६० क्युसेक वेगाने पाणी वाहत असल्याची माहिती समोर आली. या दुर्घटनेत संतोष बबन निमसे आणि सुनील निमसे यांच्या सुमारे पाच एकर क्षेत्रातील पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून अंदाजे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शेखर हाडे यांच्या ऊस शेतीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून काढणीस आलेली बाजरी जमीनदोस्त झाली आहे.
याशिवाय शंकर हांडे आणि त्यांच्या बंधूंच्या फुलशेती व धना पिकांनाही मोठा फटका बसला आहे. परिसरातील जवळपास ३० एकर शेती पाण्याखाली गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय आणि शेतजमीन पूर्ववत केल्याशिवाय कालव्यात पाणी सोडू देणार नसल्याचा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे. घटनेची सखोल चौकशी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Web Summary : A canal breach from Pimpargaon Joga Dam flooded 30 acres, damaging crops like tomatoes and sugarcane. Farmers are furious, alleging negligence by the irrigation department and demanding immediate compensation for the losses.
Web Summary : पिंपलगाँव जोगा बांध की नहर टूटने से 30 एकड़ खेत जलमग्न हो गए, टमाटर और गन्ने जैसी फसलें बर्बाद हो गईं। किसान सिंचाई विभाग की लापरवाही से नाराज हैं और नुकसान के लिए तत्काल मुआवजे की मांग कर रहे हैं।