डिंभे धरणाचा पाणीसाठा २९ टक्क्यांवर; भीमाशंकर-पाटण खोऱ्यात आदिवासींची पाण्यासाठी वणवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 13:34 IST2026-04-23T13:34:18+5:302026-04-23T13:34:27+5:30

- गेल्या पावसाळ्यात भीमाशंकर, पाटण व आहुपे या खोऱ्यात मुसळधार पाऊस पडल्याने डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र तुडुंब भरून वाहत होते.

pune news dimbhe dam water level at 29 percent; Tribals in Bhimashankar-Patan valley struggle for water | डिंभे धरणाचा पाणीसाठा २९ टक्क्यांवर; भीमाशंकर-पाटण खोऱ्यात आदिवासींची पाण्यासाठी वणवण

डिंभे धरणाचा पाणीसाठा २९ टक्क्यांवर; भीमाशंकर-पाटण खोऱ्यात आदिवासींची पाण्यासाठी वणवण

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर परिसरातील पाटण खोऱ्यासाठी वरदान ठरलेले डिंभे धरण यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आटण्याच्या मार्गावर आले असून, धरणाचा पाणीसाठा केवळ २९.०३ टक्क्यांवर आला आहे. परिणामी या भागातील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागत असून दुष्काळाच्या झळा तीव्र होत चालल्या आहेत.

गेल्या पावसाळ्यात भीमाशंकर, पाटण व आहुपे या खोऱ्यात मुसळधार पाऊस पडल्याने डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र तुडुंब भरून वाहत होते. त्यामुळे पाटण, म्हाळुंगे, कुशिरे खुर्द-बुद्रुक, मेघोली, दिगद, बेंढारवाडी या गावांतील शेतकरी उपसा सिंचनाद्वारे स्ट्रॉबेरी, बाजरी, गहू, बटाटा, कांदा, मेथी, कोथिंबीर यांसारखी रब्बी पिके मोठ्या प्रमाणावर घेत होते. मात्र, उन्हाळ्याची तीव्रता वाढताच धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने घसरली आणि पाणलोट क्षेत्र लवकरच कोरडे पडले.

या भागाला मुसळधार पावसाचे माहेरघर मानले जाते. पावसाळ्यात चार महिने सतत पाऊस कोसळत असतानाही उन्हाळ्यात मात्र पिण्याच्या पाण्यासाठीही मोठी टंचाई निर्माण होते, ही वस्तुस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. विहिरी, शिवकालीन खडकातील टाक्या, बुडीत बंधारे, तळी, डव्हरी आदी जलस्रोत पावसाळ्यात भरून वाहतात; मात्र उन्हाळ्यात त्यात पाण्याचा थेंबही शिल्लक राहत नाही.

म्हाळुंगे-कुशिरे परिसरातील डिंभे धरणाचा मागील फुगवटा तसेच पाटण पिंपरी व पिंपरी-म्हाळुंगे हद्दीत बांधण्यात आलेले कोल्हापुरी बंधारे यांमुळे काही प्रमाणात शेतीला आधार मिळत होता. मात्र, यंदा पावसाने लवकर काढता पाय घेतल्याने हे सर्व जलस्रोतही कोरडे पडले आहेत.

दरम्यान, सावरली, पिंपरी साकेरी, नानवडे, ढकेवाडी, मेघोली, बेंढारवाडी या गावांच्या अगदी हाकेच्या अंतरावर धरण असूनही येथील नागरिकांना झऱ्यांतून वाटीने पाणी टिपावे लागत आहे. पाण्याच्या टंचाईमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून महिलांना व मुलांना लांब अंतर पायपीट करावी लागत आहे.

उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच कायमस्वरूपी जलसंधारणाच्या उपायांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Web Title : डिंभे बांध का जलस्तर गिरा; आदिवासी क्षेत्रों में पानी की कमी

Web Summary : डिंभे बांध का जलस्तर 29% तक गिर गया है, जिससे भीमाशंकर-पाटण क्षेत्र के आदिवासी समुदायों के लिए पानी की भारी कमी हो गई है। भारी मानसून वर्षा के बावजूद, क्षेत्र अब सूखे जैसी स्थितियों का सामना कर रहा है, जिससे निवासियों को घटते जल स्रोतों पर निर्भर रहना पड़ रहा है और तत्काल राहत उपायों की मांग की जा रही है।

Web Title : Dimbe Dam Water Levels Drop; Tribal Areas Face Water Scarcity

Web Summary : Dimbe Dam's water level is at 29%, causing severe water scarcity for tribal communities in the Bhimashankar-Patan region. Despite heavy monsoon rains, the area now faces drought-like conditions, forcing residents to rely on dwindling water sources and demanding immediate relief measures.