क्लोरीनची गळती : श्वासाच्या त्रासामुळे २५ नागरिक रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 13:39 IST2026-05-01T13:38:40+5:302026-05-01T13:39:39+5:30
- व्यावसायिकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

क्लोरीनची गळती : श्वासाच्या त्रासामुळे २५ नागरिक रुग्णालयात दाखल
पुणे : सिलिंडरमधून क्लोरीन वायूची गळती झाल्याने गंगाधाम रोड, बिबवेवाडी परिसरातील २५ नागरिकांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, वेळीच अग्निशमन दल आणि पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. क्लोरीनमुळे महिला, पुरुष आणि लहान मुले अशा २५ जणांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाल्याने ससून रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याप्रकरणी, बिबवेवाडी पोलिसांनी व्यावसायिक जागामालक प्रकाश बाबुलाल मुथ्था (वय ७६, रा. सिटीवूड सोसायटी, सॅलेसबेरी पार्क) आणि व्यवस्थापक साहिल हमीद मुलाणी (२८, रा. अप्पर बिबवेवाडी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी (दि. ३०) रात्री साडेबाराच्या सुमारास वर्धमान लॉन्सच्या समोर, गंगाधाम रोड आई माता मंदिरासमोरील बाजूस, बिबवेवाडी येथे घडली आहे. याबाबत आश्फाक रशीद सय्यद (३३, रा. साईबाबा नगर, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सय्यद हे येथील परिसरात कुटुंबीयासह राहण्यास आहेत. रात्री साडेबाराच्या सुमारास फिर्यादी हे शालीमार सोसायटीजवळील गोडाऊनमध्ये होते. त्यावेळी त्यांना गॅस गळतीचा वास आला. बाहेरून पाहिले असता, काही लोक जमा झाले होते. त्यांनादेखील गॅस गळतीचा वास येत होता. सर्वांनी गॅस गळतीचा शोध घेतला असता आई माता मंदिरासमोरील एका गोडाऊनच्या परिसरातील एका टाकीतून वास येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ती टाकी लिकेज झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तेथील कामगारांनादेखील श्वास घेण्याचा त्रास होता होता. चौकशीत हे गोडाऊन मुथ्था यांचे असून, मुलाणी हा तेथे मॅनेजर म्हणून काम पाहतो. मुथ्था यांचा पालिकेला पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. ते बाहेरच्या राज्यातून क्लोरीनचे सिलिंडर मागवून येथे ठेवत होते.
फिर्यादी आणि नागरिकांनी वायू गळतीची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्ष आणि पोलिसांना दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनादेखील श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांनी प्रसंगावधान दाखवत श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या २५ जणांना रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयासह जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
त्यानंतर मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० जवानांनी गळती झालेल्या वायूवर नियंत्रण मिळवले. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते, सूरज बेंद्रे, उपनिरीक्षक अमोल माने यांनी भेट दिली. आरोपींनी क्लोरीन वायूचा सिलिंडर निष्काळजीने मोकळ्या जागेत ठेवला. त्याच्यावर कोणत्याही प्रकारची उपायोजना केली नाही. त्यामुळे विषारी वायू तयार होऊन तो लिकेज झाला आणि हवेत पसरला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊन त्यांच्या जिवास धोका निर्माण झाल्याचा ठपका ठेवत प्रकाश मुथ्था आणि साहिल मुलाणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.