भामा-आसखेड धरणात ५२.५३% साठा; गतवर्षीपेक्षा वाढ, तरीही उन्हाळी नियोजन गरजेचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 17:52 IST2026-04-24T17:51:53+5:302026-04-24T17:52:32+5:30
- यंदा रब्बी हंगामातील पहिले आवर्तन २१ ते २५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान १००० क्युसेक्सने सोडण्यात आले होते.

भामा-आसखेड धरणात ५२.५३% साठा; गतवर्षीपेक्षा वाढ, तरीही उन्हाळी नियोजन गरजेचे
आसखेड : भामा-आसखेड धरणात सध्या ५२.५३ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, तो गतवर्षीच्या तुलनेत सुमारे १९ टक्क्यांनी अधिक आहे. मात्र, वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता पाण्याचे काटेकोर नियोजन करणे अत्यावश्यक असल्याचे मत धरण प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आले आहे.
धरणात सध्या सुमारे ४.५० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाचे नीलेश घारे यांनी दिली. यंदा रब्बी हंगामातील पहिले आवर्तन २१ ते २५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान १००० क्युसेक्सने सोडण्यात आले होते. त्यानंतर १४ ते २५ मार्चदरम्यान पहिले उन्हाळी आवर्तन १००० क्युसेक्सने, तर ७ ते १४ एप्रिलदरम्यान दुसरे उन्हाळी आवर्तन ६०० ते १००० क्युसेक्सने नियोजनपूर्वक सोडण्यात आले.
या आवर्तनांचा फायदा खेड, शिरूर, दौंड आणि हवेली या चार तालुक्यांतील शेतकऱ्यांना होत असून, भामा व भीमा नदीवरील एकूण १८ बंधाऱ्यांमार्फत पाणी उपलब्ध होत आहे. आसखेड धरणापासून दौंड तालुक्यातील आलेगावपागापर्यंतच्या परिसरातील रब्बी पिके, फळबागा, भाजीपाला, तसेच पिण्याच्या पाणी योजनांना या विसर्गाचा मोठा फायदा होत आहे.
उपविभागीय सहायक अभियंता अश्विन पवार यांनी सांगितले की, या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांतील शेती, जनावरे आणि पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळाला आहे. सध्या धरणाची पाण्याची पातळी ६६३.६७ मीटर असून, एकूण साठा १२७.५८१ दलघमी, तर उपयुक्त साठा ११४.०५९ दलघमी इतका आहे. भामा-आसखेड हे ८.१४ टीएमसी क्षमतेचे मातीचे धरण असून, सध्या उपलब्ध साठा समाधानकारक असला, तरी पुढील काळातील उष्णतेचा विचार करता पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.