राज्यात आरटीईअंतर्गत ४७ हजार प्रवेश; सर्वाधिक ५,०८३ प्रवेश पुण्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 19:36 IST2026-04-22T19:36:14+5:302026-04-22T19:36:46+5:30
पहिल्या प्रतीक्षा यादीसाठी प्रवेशाची अंतिम मुदत प्रशासनाकडून वाढवून ३० एप्रिलपर्यंत करण्यात आली आहे.

राज्यात आरटीईअंतर्गत ४७ हजार प्रवेश; सर्वाधिक ५,०८३ प्रवेश पुण्यात
पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून, बुधवारी (दि. २२) सायंकाळपर्यंत राज्यात एकूण ४७ हजार ४२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. लवकरच हा आकडा ५० हजारांचा टप्पा पार करणार असल्याचे चित्र असून, पुणे जिल्हा सर्वाधिक ५,०८३ प्रवेशांसह राज्यात अव्वल ठरला आहे.
पहिल्या प्रतीक्षा यादीसाठी प्रवेशाची अंतिम मुदत प्रशासनाकडून वाढवून ३० एप्रिलपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप प्रवेश न घेऊ शकलेल्या पालकांना दिलासा मिळाला असून, उर्वरित जागा भरण्याची शक्यता वाढली आहे. संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, पुण्यानंतर ठाणे (४,५६७), अहिल्यानगर (२,५६५), नागपूर (२,०१७) आणि मुंबई (१,९६७) या जिल्ह्यांचा क्रम लागतो. तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी ११९ प्रवेश नोंदवले गेले आहेत. मोठ्या शहरांमध्ये प्रवेशाचा वेग तुलनेने जास्त असताना, काही ग्रामीण भागात अद्याप प्रतिसाद कमी असल्याचे दिसून येत आहे.
यंदा राज्यातील ८,७०१ शाळांमध्ये आरटीईअंतर्गत १ लाख १४ हजार ८२६ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी तब्बल २ लाख ८९ हजार २८६ पालकांनी अर्ज केले होते. ६ एप्रिल रोजी संगणकीय सोडत काढण्यात आली होती, तर १० एप्रिल रोजी निवड यादी जाहीर करण्यात आली. या यादीत सर्वसाधारण गटातील १ लाख ५ हजार २२९ आणि दिव्यांग गटातील ५८२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
मात्र, निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने हजारो जागा अद्याप रिक्त आहेत. कागदपत्रांची पूर्तता, शाळा निवडीतील बदल, तसेच वेळेअभावी काही पालकांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. परिणामी, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी संधी निर्माण होत आहे.
---
प्रतीक्षा यादीत मोठी संधी
सध्या सर्वसाधारण गटातील ८६,०३४ आणि दिव्यांग गटातील ३० विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी निर्धारित मुदतीत प्रवेश न घेतल्यास या विद्यार्थ्यांना पुढील टप्प्यात संधी दिली जाणार आहे. त्यामुळे पालकांनी आवश्यक कागदपत्रांसह तातडीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
---
प्रशासनाचा पालकांना सल्ला :
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत करावी.
शाळेशी संपर्क ठेवून प्रवेशाची खात्री करावी.
अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी.
----
आरटीई प्रवेश स्थिती (दि. २२ पर्यंत) :
एकूण शाळा : ८,७०१
उपलब्ध जागा : १,१४,८२६
प्राप्त अर्ज : २,८९,२८६
निवड झालेले विद्यार्थी : १,०५,८११
निश्चित प्रवेश : ४७,४२२
पुण्यातील प्रवेश : ५,०८३
पहिल्या प्रतीक्षा यादीची अंतिम मुदत : ३० एप्रिल २०२६.