Pune municipal water contract expires at end of August | पुणे महापालिकेच्या पाणी कराराची मुदत संपणार ऑगस्ट अखेरीस
पुणे महापालिकेच्या पाणी कराराची मुदत संपणार ऑगस्ट अखेरीस

ठळक मुद्देनवा प्रस्ताव नाही : सध्याच्या पाणी वापरात कपातीची टांगती तलवार

पुणे : महानगरपालिकेच्या पाणी कराराची मुदत येत्या ३१ऑगस्ट रोजी संपत असल्याने, पुन्हा एकदा पुण्याचा पाणी प्रश्न चर्चेला येणार आहे. अजूनही नव्या काराराबाबत महापालिकेने जलसंपदा विभागाशी संपर्क साधला नसल्याची माहिती जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे महानगरपालिका कराराप्रमाणे साडेअकरा अब्ज घनफूट पाणी घेणार की, पुन्हा मुदतवाढ घेऊन सध्याप्रमाणेच वार्षिक १७ टीएमसी प्रमाणे पाणी उचलणार याकडे लक्ष लागले आहे. 
महापालिका आणि जलसंपदा विभागामध्ये पाण्याविषयीचा झालेला करार फेब्रुवारी २०१९ मध्ये संपुष्टात आला आहे. सप्टेंबर २०१७मध्ये पुणे शहराला लोकसंख्येच्या नुसार वार्षिक ८.१९ टीएमसी (दररोज ६३५ एमएलडी) पाणी वापरास महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मंजुरी दिली होती. त्यानंतर खडकवासला प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या ४ ऑक्टोबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत पुणे शहराला वार्षिक ११.५० टीएमसी (दररोज ८९२ एमएलडी) पाणी देण्याचा निर्णय झाला. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहराला कमी पाणी देणे परवडणारे नसल्याने, राज्य सरकारने १३०० ते १३५० दशलक्ष लिटर पाणी वापराची सूचना दिली होती. 
खडकवासला साखळीतील टेमघर धरणात दुरुस्तीच्या कामामुळे पावणेचार टीएमसीच्या तुलनेत निम्मा पाणीसाठा करण्यात आला होता. परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने धरणात पुरेशा क्षमतेने पाणी नव्हते. उन्हाळ््यामधे शेती आणि पुण्याच्या पिण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पाण्याची कपात होते की काय असेही चित्र निर्माण झाले. जलसंपदाने पाणी पुरवठा देखील थांबविला होता. महापौरांनी विनंती केल्यानंतर पुन्हा पाणी सुरु करण्यात आले. तसेच, जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी कराराला ६ महिन्यांची मुदतवाढ दिली. त्याची मुदत या महिना अखेरीस संपत आहे. 
 प्रतीदिन १३३४ एमएलडी पाण्याची मागणी 
 पुण्याची लोकसंख्या ५२ लाखांच्या घरात असून शहराचा सुधारित करार करून प्रतिदिन १३३४.५० एमएलडीप्रमाणे (वार्षिक १७ टीएमसी) पाणी देण्याची मागणी पालिकेने या पुर्वी केली आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असणारा लोकसंख्येचा पुरावा सांक्षांकीत करुन दिलेला नाही. सध्या शहरासाठी दररोज १३०० ते १४०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलण्यात येत आहे. वार्षिक १७ ते साडेसतरा टीएमसी इतके हे पाणी होते. 
--------------------


Web Title: Pune municipal water contract expires at end of August
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.