Pune: विमा दाव्याच्या रकमेसाठी रुग्णालयाने अडविला मृतदेह; अवघ्या १३ तासांच्या उपचाराचे तब्बल सव्वातीन लाखांचे बिल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 12:44 IST2026-05-19T12:43:35+5:302026-05-19T12:44:21+5:30
दरम्यान रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणी मृताचे नातेवाईक व संबंधितांचे आरोप चुकीचे असल्याचे सांगताना मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांकडूनच विलंब झाल्याचे म्हटले आहे.

Pune: विमा दाव्याच्या रकमेसाठी रुग्णालयाने अडविला मृतदेह; अवघ्या १३ तासांच्या उपचाराचे तब्बल सव्वातीन लाखांचे बिल
पुणे : स्टेशन परिसरातील एका धर्मादाय रुग्णालयाने आरोग्य विम्याचा दावा मंजूर झाला नाही, म्हणून मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिल्याचा आरोप मृताचे नातेवाईक व स्थानिक नगरसेवक सुहास टिंगरे यांनी केला आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने संबंधित आरोप चुकीचे असल्याचे सांगत झाल्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात नातेवाइकांकडून कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असून, या प्रकरणाची दखल घेऊन महापालिका आरोग्य विभागाने रुग्णालयाला नोटीस बजावत २४ तासांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
धानोरी येथील नीलेश चंद्रभान चत्तर (वय ३१, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) यांना शनिवारी (दि. १६) सकाळी ११.४० दरम्यान स्टेशन परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोटदुखी, ताप, अंगदुखीमुळे अत्यावस्थ अवस्थेत दाखल झालेल्या रुग्णावर डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच रात्री ११.०५ सुमारास रुग्णाचा मृत्यू झाला. त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने अवघ्या १२-१३ तासांत ३ लाख २५ हजारांचे बिल केल्याचे आणि रुग्णाचा विमा दावा मान्य झाला नाही, म्हणून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला नसल्याचा आरोप नगरसेवक सुहास टिंगरे यांनी केला आहे.
रुग्णाचा आरोग्य विमा असताना रुग्णालयाने नातेवाइकांकडून ५० हजारांचे अनामत रक्कम घेतल्याचे आरोप टिंगरे यांनी केला आहे. उपचारादरम्यान अवघ्या १३ तासांत रुग्ण दगावला, अशा अवस्थेत आरोग्य विमा कंपनीकडून बिलाची मंजुरी आल्याशिवाय मृतदेह ताब्यात देणार नाही, अशी भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे.
नगरसेवक सुहास टिंगरे यांनी सांगितले की, मी स्वत: रुग्णालयात जाऊन तेथील कारभाराबद्दल प्रश्न उपस्थित केले असता उपस्थित कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यावेळी मोबाइलद्वारे रुग्णालय कर्मचाऱ्यांशी होत असलेले बोलणे व्हिडीओ रेकॉर्डिंग करत असतानाही तेथील कर्मचाऱ्यांनी प्रतिबंध केल्याचे सांगितले. दरम्यान नातेवाइकांकडून या घटनेविरोधात कोरेगाव पाेलिस ठाण्यात रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे समजते.
रुग्णालय प्रशासनाकडून सारवासारव
दरम्यान रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणी मृताचे नातेवाईक व संबंधितांचे आरोप चुकीचे असल्याचे सांगताना मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांकडूनच विलंब झाल्याचे म्हटले आहे. रुग्णाचा मृत्यू शनिवारी (दि. १६) रात्री ११.३० दरम्यान झाल्यानंतर पहाटे १.०० च्या दरम्यान कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाली. त्याच वेळेस नातेवाइकांना मृतदेह ताब्यात घेण्यास सांगितले होते, त्यावेळी रात्र असल्याने मृतदेह शवागृहात ठेवण्यात यावा, सकाळी मृतदेह ताब्यात घेऊ असे नातेवाइकांनी सांगितले होते. त्यावेळी बिलासाठी अथवा विमा दाव्याच्या मंजुरीसाठी मृतदेह अडवला नसल्याचा खुलासा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तातडीच्या वेळी रुग्णाच्या नातेवाइकांकडून पैशांची मागणी न करता तातडीचे उपचार देणे बंधनकारक आहे. त्याच बरोबर बिलाची रक्कम अदा झाली नाही म्हणून मृतदेह अडवता येत नाही, असे असतानाही वडिलांनंतर घरातील एकुलता एक कमावता मुलगा गमावल्यामुळे कुटुंब दुःखात असतानाच, विमा दावा मंजूर झाला नाही, म्हणून मृतदेह ताब्यात देण्यास नकार देण्याचा प्रकार धक्कादायक आहे. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाई करण्यात यावी. - सुहास टिंगरे, स्थानिक नगरसेवक.