Video: आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी; नसरापूर प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस कठोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 15:31 IST2026-05-02T15:30:13+5:302026-05-02T15:31:17+5:30
Pune Crime: आरोपीला शक्य तितक्या लवकर मृत्युदंड मिळावा, अशी मागणी सरकार न्यायालयात करणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला

Video: आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी; नसरापूर प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस कठोर
नसरापूर (पुणे जि.) : नसरापूर येथे साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या अमानुष घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. या प्रकरणावर आता देवेंद्र फडणवीस यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नसरापूर येथील घटना अत्यंत निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे. आरोपीला शक्य तितक्या लवकर मृत्युदंड मिळावा, अशी मागणी सरकार न्यायालयात करणार आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याआधी रोहित पवार यांनी देखील आरोपी यापूर्वी दोन वेळा जामिनावर बाहेर आल्याचा मुद्दा उपस्थित करत कठोर कायद्याची मागणी केली होती. नसरापूर परिसरात नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण असून, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच या प्रकरणाची फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी व्हावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.
नसरापूर अत्याचार घटनाक्रम
शुक्रवार दुपारी 3. वा... पीडित चिमुकली शेवटची राम मंदिर परिसरात दिसली...
दु. 3:45वा. पाऊनतास होऊनही मुलगी घरी न आल्याने आज्जीकडून मुलीचा शोध सुरू...
दु. 4 वा. नसरापूर ग्रामस्थांकडून मुलीची शोधाशोध सुरू
दुपारी 4.30 वा...गावातील सीसीटीव्ही शोधले तेव्हा आरोपी मुलीला घेऊन गोठ्याकडे जाताना दिसला
संध्या. 5.30 वा. ग्रामस्थांनी आरोपीला बनेश्वर फाट्यावरून पकडून आणला, चोप मिळताच आरोपी ने मुलीचा मृतदेह लपून ठेवलेली जागा गावकऱ्यांना सांगितली...आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलम
संध्या 6:00 वा...शेणाच्या ढिगाऱ्यातून अत्याचारीत चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढताच गावकऱ्यांचा उद्रेक झाला...
संध्या. 7 वा. ....संतप्त ग्रामस्थांचा पोलिसांना जागेवरच घेराव...वादावादीनंतर पोलिसांनी डेडबॉडी हलवली
राञी 8 वा. ग्रामस्थांचा राजगड पोलीस स्टेशनला घेराव
राञी 9 वा...गावकऱ्यांनी बँगळुरू हायवेवर रास्ता रोको केला...
राञी 11 वा. एसपी गिल आंदोलन स्थळी दाखल...लेखी आश्वासनानंतर रास्तारोको मागे पण शनिवारी गावबंदीची घोषणा केली
शनिवार सकाळी 7 पासून नसरापुरात कडकडीत बंद
शनिवार सकाळी 9 वा...फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल, पुरावे गोळा करण्याचे काम सुरू
सकाळी 10 वा...नसरापूर च्या भैरवनाथ मंदिरापासून मोर्चा सुरू...
सकाळी 11 वा. सुपर बाजार परिसरात मोर्चा आंदोलन सभेत रूपांतरित
दुपारी 11:30 पर्यंत...गाव पुढारीकडून आंदोलकांची समजून काढली पण तरीही गावकरी ऐकेनाथ
दु. 11:45 वा...भोरचे आमदार शंकर मांडेकर आंदोलन स्थळी आले, कठोर कारवाईचं आश्वासन दिलं तरीही मोर्चेकरी ऐकेनाथ...थेट सीएमना फोन करण्याची मागणी लावून धरली
12.15 वा...माजी आमदार संग्राम थोपटे आंदोलन स्थळी दाखल, मोर्चेकऱ्यांना संबोधित करून केस फास्ट ट्रँकवर नेण्याचं आश्वासन...तरीही मोर्चेकरी ऐकेनाथ
12.20 ते 12: 30 वा...मांडेकरांनी सीएमना दोनदा फोन लावण्याचा प्रयत्न केला पण फोन लागला नाही
दु. 12:34 वा ...मंञी आदिती तटकरेंना फोन लागला...आणि आमदारांनी पुन्हा आश्वासन देऊन हायवे न रोकण्याचं आवाहन केले...
दु. 12:40 वा ...अखेर दोन्ही आमदारांच्या विनंती नंतर मोर्चा स्थगित...पण ग्रामस्थांचा संताप कायम