- कल्याणराव आवताडे
धायरी : ज्या घरात कालपर्यंत लहानग्या पावलांचा आणि निरागस हास्याचा किलबिलाट असायचा, आज त्या घराच्या उंबरठ्यावर फक्त स्मशान शांतता पसरली आहे. नसरापूर येथे झालेल्या त्या अमानवीय आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेने संपूर्ण पुण्याला हादरवून सोडले आहे. जेव्हा धायरी येथील परिसरात त्या चिमुकलीचा निष्प्राण देह अंत्यसंस्कारासाठी आणला गेला, तेव्हा उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला. उपस्थितांच्या डोळ्यांत साठलेला संताप आणि माऊलीच्या आक्रोशाने उपस्थित सर्वांचे हृदय पिळवटून निघाले.
मुलीच्या कुटुंबीयांचे दुःख जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, स्थानिक आमदार भीमराव तापकीर, नगरसेविका कोमल नवले, नगरसेवक काकासाहेब चव्हाण आणि नगरसेविका अनिता इंगळे यांनी या दुर्दैवी कुटुंबीयांची भेट घेतली. या अत्यंत क्लेशदायकप्रसंगी सर्वांचे कंठ दाटून आले होते. याप्रकरणी आरोपीला लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील असल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नसरापूरमध्ये हत्या झालेल्या मुलीच्या पुण्यातील घरी सांत्वनपर भेट दिली. यावेळी या मुलीचे कुटुंबीय आणि आजूबाजूच्या लोकांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे आरोपीच्या विरोधात लवकरात लवकर खटला चालवून त्याला शिक्षा करण्याची मागणी केली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी जमावाच्या समोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला आणि जमावाच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे.
घराबाहेर जनक्षोभ : "आरोपीला आमच्या स्वाधीन करा!"...
एकीकडे राजकीय नेते सांत्वन करत असताना, घराबाहेर जमलेल्या नागरिकांच्या मनातील संताप धगधगत होता. प्रशासन आणि आरोपीबद्दलचा हा राग शांत होण्याऐवजी वाढतच गेला. जमावातील नागरिक आक्रमक झाले होते. ‘आम्हाला न्याय नको, आरोपी हवा आहे! एकतर आरोपी आमच्या ताब्यात द्या किंवा त्याचा एन्काऊंटर करा, तरच आम्ही इथून उठू,’ अशी जोरदार घोषणाबाजी करत काही नागरिकांनी थेट सुनेत्रा पवार यांच्या ताफ्यासमोर बसून करण्याचा प्रयत्न केला. निरागस मुलीवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध हा संताप उपस्थितांमध्ये होता.
सुरक्षिततेच्या नावाखाली पोलिस बळाचा वापर...
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. प्रचंड गर्दी आणि वाढता तणाव पाहता, पोलिसांनी सुनेत्रा पवार यांच्या वाहनांना पाठीमागील रस्त्याने सुरक्षित मार्ग करून दिला आणि नेते तिथून निघून गेले. मात्र, नेत्यांच्या जाण्याने जनक्षोभ शांत होण्याऐवजी अधिकच आक्रमक झाला. ‘आम्ही आमच्या लेकीला गमावले आणि प्रशासन मात्र स्वतःची सुरक्षा करण्यात मग्न आहे,’ अशी भावना संतप्त नागरिकांनी व्यक्त केली.
‘नराधमाला फाशी द्या’
आज केवळ धायरीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र त्या मुलीच्या न्यायासाठी प्रार्थना करत आहे. अशा नराधमांना जगण्याचा अधिकार आहे का? हा प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनात निर्माण झाला आहे. आरोपीला केवळ तुरुंगात डांबून उपयोग नाही, तर त्याला अशी शिक्षा द्यायला हवी, ज्यामुळे भविष्यात पुन्हा कधीही कोणत्या नराधमाची नजर एकाही निष्पाप मुलीकडे वळणार नाही. प्रशासन आता तरी जागे होणार का? की पुन्हा अशाच एखाद्या घटनेची वाट पाहिली जाणार? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
Web Summary : Dhairy mourns the tragic death of a young girl, sparking outrage. Political leaders visit the grieving family, promising swift justice. Protests erupt, demanding severe punishment for the accused, reflecting widespread public anger and calls for accountability from authorities.
Web Summary : धायरी एक बच्ची की दुखद मौत पर शोक मना रहा है, जिससे आक्रोश फैल गया है। राजनीतिक नेता शोक संतप्त परिवार से मिलते हैं, शीघ्र न्याय का वादा करते हैं। आरोपी को कड़ी सजा देने की मांग करते हुए विरोध प्रदर्शन भड़क उठे, जो व्यापक सार्वजनिक क्रोध और अधिकारियों से जवाबदेही की मांग को दर्शाते हैं।