देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा आगीच्या तांडवाने हादरली आहे. विवेक विहार परिसरात एसीच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील ५ सदस्यांचा समावेश असून, बचावकार्यादरम्यान समोर आलेलं दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आलं.
शनिवार-रविवारची ती रात्र विवेक विहारमधील बी-ब्लॉकसाठी काळरात्र ठरली. गाढ झोपेत असताना झालेल्या एका एसी ब्लास्टने हसत्या-खेळत्या जैन कुटुंबाचा अंत केला. या भीषण अग्निकांडात ९ जणांनी जीव गमावला, पण त्यात दीड वर्षांच्या चिमुरड्या आरूचा आणि त्याच्या आईचा झालेला अंत पाहून सुन्न व्हायला होतं. जेव्हा बचाव पथक घरात शिरलं, तेव्हा निष्पाप आरूचा मृतदेह त्याच्या आईच्या, आंचलच्या छातीला घट्ट बिलगलेला होता. मृत्यूच्या दारातही आईने आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला, पण नियतीला काही दुसरंच मान्य होतं.
वाढदिवसाचा आनंद शोकात बदलला
या घटनेत अरविंद जैन (६२), अनिता जैन, मुलगा निशांक (३४), सून आंचल आणि नातू आरू यांचा करुण अंत झाला. विशेष म्हणजे, रविवारी निशांकचा भाऊ दीपक जैन यांच्या तीन वर्षांच्या मुलाचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी दीपक यांचे कुटुंब मानेसरला गेले होते. निशांकची तब्येत ठीक नसल्याने तो घरीच थांबला होता. रात्री १२ वाजता दोन्ही भावांनी व्हिडिओ कॉलवर केक कापून आनंद साजरा केला, पण अवघ्या तीन तासांत या आनंदाची जागा किंकाळ्यांनी घेतली.
"भैया वाचवा..." निशांकचा शेवटचा कॉल
पहाटे ३ च्या सुमारास अचानक एसीचा भीषण स्फोट झाला आणि पाहता पाहता घराचं रूपांतर आगीच्या गोळ्यात झालं. घरातून बाहेर पडण्याचे सर्व रस्ते बंद झाले होते. अशा परिस्थितीत मृत्यू डोळ्यासमोर दिसत असताना निशांकने आपला भाऊ दीपकला व्हिडिओ कॉल केला. "भैया, आम्हाला वाचवा... घरात आग लागली आहे," ही निशांकची शेवटची हाक होती. त्यानंतर संपर्क तुटला आणि काही क्षणांतच संपूर्ण कुटुंब आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. मृतदेह इतके जळले आहेत की त्यांची ओळख पटवणंही कठीण झालं असून, डीएनए नमुने घेण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. ९ निष्पाप जीवांचा मृत्यू ही अत्यंत हृदयद्रावक घटना असल्याचं सांगत त्यांनी पीडित कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. प्रशासनाने या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून, घरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आग कशी पसरली, याचा तपास केला जात आहे.
Web Summary : A Delhi AC blast killed nine, including a Jain family of five. A toddler was found clinging to his mother. A birthday celebration turned tragic after a desperate last call for help. The Chief Minister has expressed grief and ordered an inquiry.
Web Summary : दिल्ली में एसी विस्फोट से नौ की मौत, जिनमें जैन परिवार के पांच सदस्य शामिल हैं। एक बच्चा अपनी माँ से चिपका मिला। जन्मदिन का जश्न दुख में बदल गया, मदद के लिए अंतिम कॉल व्यर्थ गई। मुख्यमंत्री ने शोक व्यक्त किया और जांच के आदेश दिए।