उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरमध्ये रविवारी सकाळी वायूसेनेने एका रेस्क्यू ऑपरेशनद्वारे पाण्याच्या टाकीवर अडकलेल्या दोन मुलांना सुरक्षितपणे खाली उतरवलं. सुमारे १६ तास टाकीवर अडकून पडल्यानंतर वायूसेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने या दोघांची सुटका करण्यात आली. ही घटना कांशीराम निवासी वसाहतीत घडली, जिथे शनिवारी पाच मुलं सोशल मीडियासाठी 'रील' बनवण्याच्या नादात एका उंच पाण्याच्या टाकीवर चढली होती.
याच दरम्यान टाकीची शिडी अचानक तुटली. यामुळे सिद्धार्थ, शनी आणि गोलू नावाची तीन मुलं खाली पडली, तर पवन आणि कल्लू नावाची दोन मुलं टाकीवरच अडकून पडली. टाकीवरून खाली पडल्याने गंभीर दुखापत होऊन सिद्धार्थचा मृत्यू झाला. शनी आणि गोलू यांना उपचारासाठी माधव प्रसाद त्रिपाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती आता ठीक असल्याचं सांगण्यात येत आहे.
टाकीची शिडी तुटल्यामुळे वर अडकलेल्या मुलांकडे खाली उतरण्यासाठी कोणताही मार्ग उरला नव्हता. रात्री गोरखपूरहून 'एनडीआरएफ'चे (NDRF) पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी बचावकार्य सुरू केलं. मात्र टाकीपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नसल्यामुळे त्यांची 'लिफ्ट' यंत्रणा काम करू शकली नाही आणि रात्रीची बचाव मोहीम यशस्वी होऊ शकली नाही.
१६ तासांपासून अडकली होती मुलं
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे मदत मागितली. त्यानंतर वायूसेनेने गोरखपूर येथील सेंट्रल एअर कमांडमधून एक 'Mi-17 V5' हेलिकॉप्टर मुलांच्या बचाव मोहिमेसाठी रवाना केलं. रविवारी सकाळी ५:२० च्या सुमारास हेलिकॉप्टर पाण्याच्या टाकीजवळ पोहोचलं आणि तत्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं. वायूसेनेच्या जवानांनी अवघ्या १५ मिनिटांत, गेल्या १६ तासांपासून अडकलेल्या दोन्ही मुलांना सुरक्षितपणे खाली उतरवलं.
हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू करण्याचा निर्णय
बचावानंतर दोन्ही मुलांना त्याच हेलिकॉप्टरने गोरखपूरला नेण्यात आलं, तिथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. प्रशासनाने रात्रीच्या वेळी टाकीपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यायी रस्ता बनवण्याचा प्रयत्न केला होता. पहाटे ३ वाजेपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले होते, मात्र अचानक पाऊस सुरू झाल्याने काम थांबवावं लागलं. अखेर हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संपूर्ण मोहिमेदरम्यान जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस दल आणि इतर यंत्रणा घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होत्या.
Web Summary : Uttar Pradesh youths climbed a water tank for a reel; ladder broke. One died falling; two were injured. Two stranded were rescued by the Air Force after 16 hours.
Web Summary : उत्तर प्रदेश में रील बनाने के लिए कुछ युवक पानी की टंकी पर चढ़े। सीढ़ी टूटने से एक की मौत हो गई, दो घायल हो गए। वायुसेना ने 16 घंटे बाद दो को बचाया।