ज्या मैत्रिणीवर विश्वास ठेवून घराचे दरवाजे उघडे ठेवले, त्याच मैत्रिणीने घराचा दिवा विझवल्याची हृदयद्रावक घटना सहारनपूरमध्ये घडली आहे. १४ वर्षीय अंशुमनच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याची आई ज्योतीची जवळची मैत्रीण पूजा हिला अटक केली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, एका मातेने आपल्या मुलाला कायमचे गमावले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अंशुमन हा बालकृष्ण भारती यांचा सर्वात धाकटा आणि लाडका मुलगा होता. आरोपी पूजा ही त्याच्या आईची जवळची मैत्रीण असल्याने तिचे त्यांच्या घरी सतत येणे-जाणे होते. पूजा ही व्याजाने पैसे देण्याचे काम करायची आणि परिसरात तिची 'दबंग' अशी ओळख होती. मात्र, तिचे वागणे काही दिवसांपासून विचित्र झाले होते. ती अनेकदा अंशुमनच्या घरी येऊन वाद घालायची, मुलांना मारहाण करायची आणि तोडफोडही करायची. याच कारणास्तव बालकृष्ण यांनी तिला घरात येण्यास मनाई केली होती. याच रागातून तिने हे भयानक पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
सीसीटीव्ही फुटेजमुळे 'लेडी किलर'चा पर्दाफाश
१ मे रोजी दुपारी २ वाजता अंशुमन घरातून सामान आणण्यासाठी बाहेर पडला, पण तो परतलाच नाही. चिंतेत असलेल्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात धक्कादायक वास्तव समोर आले; अंशुमन हा पूजासोबत जाताना स्पष्ट दिसत होता. पोलिसांनी पूजाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, तिने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल केली. मात्र, जेव्हा तिला सीसीटीव्ही फुटेज दाखवले, तेव्हा तिने आपला गुन्हा कबूल केला.
यमुना नदीत फेकले जिवंत?
पूजाच्या कबुलीजबाबाने पोलीसही चक्रावून गेले. तिने सांगितले की, ती अंशुमनला हरियाणाच्या यमुनानगरपर्यंत घेऊन गेली आणि तिथून त्याला अंबाला रोडवरील पूर्व यमुना नदीत फेकून दिले. पालकांच्या म्हणण्यानुसार, तिने मुलाला नदीत बुडवून मारले असावे. शनिवारी रात्रभर चाललेल्या शोध मोहिमेनंतर रविवारी सकाळी अंशुमनचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला.
फाशीची मागणी
अंशुमनचा मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. "ज्या हाताने तिने माझ्या मुलाचा जीव घेतला, तिला तशीच कडक शिक्षा मिळाली पाहिजे," अशी मागणी त्याचे वडील करत आहेत. आरोपी महिलेला फाशी द्यावी, अशी मागणी करत संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. पोलीस आता या हत्येमागे केवळ वादाचे कारण होते की आणखी काही व्यवहार, याचा तपास करत आहेत.
Web Summary : A close friend betrayed a family's trust by plotting the murder of their 14-year-old son in Saharanpur. CCTV footage revealed the horrifying truth, leading to the arrest of the mother's friend, Pooja. The boy was thrown into a river. Outrage grips the community, demanding justice.
Web Summary : सहारनपुर में एक करीबी दोस्त ने विश्वासघात कर 14 वर्षीय बेटे की हत्या की साजिश रची। सीसीटीवी फुटेज से भयावह सच्चाई सामने आई, जिससे माँ की दोस्त पूजा की गिरफ्तारी हुई। लड़के को नदी में फेंक दिया गया था। समुदाय में आक्रोश, न्याय की मांग।