Pune Crime : पुणे शहर बनतेय 'उडता पंजाब'; कॉलेजपासून गांजाची झाली घुसखोरी सोसायटीपर्यंत

By नितीश गोवंडे | Updated: April 18, 2026 12:19 IST2026-04-18T12:16:37+5:302026-04-18T12:19:30+5:30

Pune Crime ‘तस्करी’ या वेब सिरीजमध्ये तस्करीसाठी तस्कर कोणकोणत्या मार्गांचा अवलंब करतात हे दाखवण्यात आले आहे. त्याच पद्धतीने बँकॉक-पुणे विमानात ड्रग तस्करीचा प्रकार मार्च महिन्यात उघडकीस आला होता.

Pune Crime is becoming 'Flying Punjab'; Cannabis has infiltrated from colleges to society | Pune Crime : पुणे शहर बनतेय 'उडता पंजाब'; कॉलेजपासून गांजाची झाली घुसखोरी सोसायटीपर्यंत

Pune Crime : पुणे शहर बनतेय 'उडता पंजाब'; कॉलेजपासून गांजाची झाली घुसखोरी सोसायटीपर्यंत

पुणे : एकेकाळी शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर आता गांजा तस्करीच्या वाढत्या जाळ्यामुळे चिंतेत सापडले आहे. अलीकडील कारवायांमधून उघड झालेल्या माहितीवरून शहरात केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तस्करीच्या विविध मार्गांचा वापर करून पुण्यात गांजा आणला जात असल्याचे समोर आले आहे.

विशेषतः छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेशातून ‘गोल्डन ट्रँगल’च्या माध्यमातून गांजाचा पुरवठा होत असून, शहरात त्याचे वितरण संघटित पद्धतीने केले जात आहे. पुणे पोलिसांकडूनही वारंवार शहराच्या विविध भागांमध्ये गांजा विकताना, विकत घेतानाच्या दररोज कारवाया केल्या जात आहेत.

हायड्रोपोनिक गांजाचा वाढता ट्रेंड

सध्या ‘हायड्रोपोनिक गांजा’ हा नवीन ट्रेंड समोर आला आहे. मातीशिवाय नियंत्रित वातावरणात तयार होणाऱ्या या गांजाची गुणवत्ता आणि किंमत दोन्ही जास्त असल्याने त्याला विशेष मागणी आहे. शहरातील उच्चभ्रू वर्ग आणि विद्यार्थ्यांमध्ये याचा वापर वाढत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. थायलंडमध्ये किराणा माल ज्याप्रमाणे दुकानात सहज मिळतो, तसा हायड्रोपोनिक गांजादेखील सहज उपलब्ध होतो. तेथून भारतात गांजातस्कर हायड्रोपोनिक गांजा मोठ्या प्रमाणात आणत असल्याचे कस्टम विभागाने केलेल्या कारवायांवरून दिसून येते.

---

तस्करीचे नवे तंत्र आणि बदलते मार्ग

तस्करांकडून आता अत्याधुनिक पद्धतींचा वापर केला जात आहे. ड्रोन, कुरिअर सेवा, खासगी वाहने, तसेच रेल्वे आणि बसचा वापर करून गांजा शहरात पोहोचवला जातो. लहान-लहान पॅकेटस्मध्ये विभागून माल पाठवला जात असल्याने पोलिसांना शोध घेणे अधिक कठीण होत आहे.

---

तरुण वर्ग सर्वाधिक टार्गेट...

कॉलेज परिसर, हॉस्टेल्स आणि आयटी पार्क्सजवळ गांजाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे. कमी किमतीत उपलब्धता आणि ‘कूल’ ट्रेंड म्हणून त्याची ओळख निर्माण केल्यामुळे तरुण वर्ग या जाळ्यात अडकत आहे.

---

शहरासाठी इशारा

तज्ज्ञांच्या मते, पुणे हे केवळ वापराचे केंद्र नसून ‘ट्रान्झिट हब’ बनत चालले आहे. त्यामुळे यावर वेळीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा शहरातील सामाजिक आणि शैक्षणिक वातावरणावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

---

दोन वर्षांत ४० कोटींपेक्षा अधिक किमतीचा गांजा जप्त

सन २०२५ ते आजपर्यंत पोलिस आणि कस्टम विभागाने केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये ४० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. २७ जुलै २०२५ रोजी सर्वाधिक १० कोटी रुपयांचा; तर ६ ऑगस्ट २०२५ रोजी ६ कोटींचा; तर ७ मार्च २०२६ मध्ये ८.७१ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे. यावेळी १५ पेक्षा अधिक तस्करांनाही अटक करण्यात आली.

---

वेब सिरीजमध्ये दाखवल्याप्रमाणे तस्करी

‘तस्करी’ या वेब सिरीजमध्ये तस्करीसाठी तस्कर कोणकोणत्या मार्गांचा अवलंब करतात हे दाखवण्यात आले आहे. त्याच पद्धतीने बँकॉक-पुणे विमानात ड्रग तस्करीचा प्रकार मार्च महिन्यात उघडकीस आला होता. बँकॉकहून एक विमान भारतात येण्यासाठी निघाले. त्यावेळी विमानातील एका तस्कराने बँकॉकहून भारतात येताना विमानाच्या बाथरूममध्ये गांजा लपवून ठेवला. विमान भारतातील अन्य एका शहरात लँड झाले. तस्कर विमानातून उतरून गेला. पुढे तेच विमान इंटरनॅशनलचे नॅशनल झाले. दुसरा प्रवासी (तस्कर) त्या शहरातून त्याच विमानात बसला. विमान प्रवासादरम्यान संबंधित तस्कराने बाथरूममध्ये लपवून ठेवलेला गांजा स्वत:कडे काढून घेतला. पुणे विमानतळावर विमान लँड झाल्यानंतर कस्टम विभागाच्या लोकांनी त्याला पकडले. यासह पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर खेळणी, चॉकलेट्स, चिप्स यांद्वारेही गांजाची तस्करी होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

----------------------

Web Title : पुणे में बढ़ता गांजे का खतरा: कॉलेजों से सोसायटियों तक, नशीली दवाओं का अड्डा

Web Summary : पुणे में गांजे का कारोबार बढ़ रहा है, जो एक शिक्षा केंद्र से नशीली दवाओं के पारगमन बिंदु में बदल रहा है। छत्तीसगढ़, ओडिशा और आंध्र प्रदेश से आपूर्ति मार्ग छात्रों और अभिजात वर्ग के बीच वितरण को बढ़ावा देते हैं, जिसमें हाइड्रोपोनिक गांजे का उपयोग और नवीन तस्करी विधियाँ बढ़ रही हैं।

Web Title : Pune's Growing Weed Problem: From Colleges to Societies, a Drug Hub

Web Summary : Pune faces a rising ganja (cannabis) trade, transforming from an educational hub to a drug transit point. Supply routes from Chhattisgarh, Odisha, and Andhra Pradesh fuel distribution among students and the elite, with increasing hydroponic ganja use and innovative smuggling methods.