पुणे : वैमनस्यातून तरुणावर पिस्तुलातून गोळीबार, तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना मध्यरात्री येरवडा परिसरात घडली. या प्रकरणी आरोपींविरोधात विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. गौरव गणेश तेलंगी (वय १८, सध्या रा. बिंडसर वस्ती, नऱ्हे, मूळ रा. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी तौफीक शेख, समीर शिंदे, राजन दोरास्वामी (तिघे रा. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सयान निजामुद्दीन शेख (वय १८, रा. वैदुवाडी, इंदिरानगर, हडपसर) याने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी येथील मुख्य चौकात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. १४) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गौरव, त्याचे मित्र रवी कोळी, शाहरुख शेख, रेहान हे दुचाकीवरून विश्रांतवाडी भागात आले होते. येरवड्यातील पंचशीलनगर परिसरात त्यांनी दुचाकी लावली होती. आरोपींशी गौरव याचा काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. वादातून आरोपींनी गौरवचा खून करण्याचा कट रचला होता. विश्रांतवाडीतील कार्यक्रम संपल्यानंतर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गौरव आणि त्याचे मित्र पंचशीलनगर परिसरात लावलेली दुचाकी घेण्यासाठी निघाले होते.
आराेपी गौरवच्या मागावर होते. येरवड्यातील काॅमर्स झोन आयटी कंपनीजवळील रस्त्यावर आरोपींनी गौरवला गाठले आणि त्याच्यावर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी त्यांना धमकावले. आरोपींनी केेलेल्या हल्ल्यात गौरव गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच तो मरण पावला होता. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे, परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला, तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगेश हांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संपतराव राऊत पुढील तपास करत आहेत.
आधी गोळीबार, मग कोयत्याने वार
हल्लेखोरांनी सुरुवातीला गौरववर गोळीबार केला; मात्र गोळीचा नेम चुकला. त्यानंतर संतापलेल्या आरोपींनी धारदार कोयत्याने गौरववर वार केले. त्यानंतर आरोपींनी क्रूरतेचा कळस गाठत जवळच पडलेले दगड आणि विटांनी गौरवच्या डोक्यावर प्रहार केले. या अचानक झालेल्या घटनेमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
Web Summary : In Yerwada, Pune, a young man named Gaurav Telangi was murdered due to prior animosity. The assailants shot at him and attacked with a sickle. Police are investigating the crime and searching for the accused.
Web Summary : पुणे के येरवदा में पुरानी दुश्मनी के चलते गौरव तेलंगी नामक युवक की हत्या कर दी गई। हमलावरों ने उस पर गोली चलाई और दरांती से हमला किया। पुलिस मामले की जांच कर रही है और आरोपियों की तलाश जारी है।