सोमेश्वरनगर ( पुणे जि. ) : बारामती तालुक्यातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या आरोपावरून फलटण येथील डॉ. योगेश नरुटे याला वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईनंतर फलटण परिसरात बेकायदेशीर गर्भपाताचे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होत असून, प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव निंबाळकर परिसरातील अल्पवयीन मुलीवर काही दिवसांपूर्वी अत्याचार झाल्यानंतर ती गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर तिला उपचाराच्या नावाखाली फलटण येथील डॉ. नरुटे यांच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, गर्भपात करताना आवश्यक वैद्यकीय नियम, शासकीय परवानगी आणि बालसंरक्षणाशी संबंधित कायद्यांचे पालन न केल्याचा आरोप डॉक्टरवर ठेवण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच वडगाव निंबाळकर पोलिसांनी तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत संशय बळावल्याने पोलिसांनी डॉक्टरला ताब्यात घेत अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. ६) फलटण येथील संबंधित रुग्णालयात झाडाझडती घेण्यात आली. या वेळी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, या प्रकरणातून फलटण परिसरात बेकायदेशीर गर्भपाताचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या रॅकेटमध्ये दलाल, मध्यस्थ तसेच इतर वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग असू शकतो, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांकडून रुग्णालयातील उपचार नोंदी, वैद्यकीय कागदपत्रे आणि गर्भपात प्रक्रियेची माहिती तपासली जात आहे. तसेच पीडित मुलीला फलटणपर्यंत कोणी नेले, डॉक्टरशी संपर्क कसा साधला गेला, याबाबतही चौकशी सुरू आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोधही पोलिसांकडून सुरू असून, आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. पुढील काळात अटकसत्र वाढण्याची चिन्हे आहेत. या घटनेमुळे बारामती व फलटण परिसरांत संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील व त्यांच्या पथकाकडून सुरू आहे.
Web Summary : Doctor arrested in Phaltan for illegal abortion of minor from Baramati. Police suspect a larger racket, investigating hospital records and connections. More arrests expected.
Web Summary : बारामती की नाबालिग का फलटण में अवैध गर्भपात कराने पर डॉक्टर गिरफ्तार। पुलिस को बड़े रैकेट का संदेह, अस्पताल के रिकॉर्ड और कनेक्शन की जांच। और गिरफ्तारियां अपेक्षित।