Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म

Suryakumar Yadav blessed with Baby Girl: सूर्या मुंबई इंडियन्स संघासोबत रायपूरला गेला नव्हता. त्याचे कारण आज समोर आले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 19:54 IST

Open in App

Suryakumar Yadav blessed with Baby Girl: भारतीय क्रिकेट संघाचा टी-२० कर्णधार आणि 'मिस्टर ३६०' नावाने प्रसिद्ध असलेला फलंदाज सूर्यकुमार यादव याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी यांना कन्यारत्न झाले आहे. सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्ससोबत IPL 2026 मध्ये व्यस्त आहे. पण कालच अशी बातमी आली होती की, तो संघासोबत रायपूरला गेला नाही. आज यामागचे कारण समोर आले. आपल्या पत्नीसोबत आणि कुटुंबीयांसोबत तो मुंबईतच थांबला होता. ही गोड बातमी कळल्यानंतर चाहत्यांकडून या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


गुरुवारी सकाळी देविशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सूर्यकुमार आणि देविशा हे कॉलेज काळापासून एकमेकांना ओळखतात. २०१६ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. लग्नाच्या आठ वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात या पहिल्या अपत्याचे आगमन झाले आहे. सूर्यकुमार नेहमीच आपल्या यशाचे श्रेय पत्नी देविशाला देत आला आहे. "तिने माझ्या कठीण काळात मला खंबीर पाठिंबा दिला," असे त्याने अनेक मुलाखतींमध्ये आवर्जून सांगितले आहे. तशातच आज त्यांच्या आयुष्यात नव्या पाहुणीचे आगमन झाले आहे. त्यामुळे केवळ सूर्याचे कुटुंबच नव्हे, तर त्याचा चाहतावर्गही आनंदात आहे.



सध्या सूर्यकुमार यादव आयपीएल २०२६ (IPL 2026) मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत आहे. कौटुंबिक जबाबदारी आणि आयुष्यातील या आनंदाच्या क्षणानंतर, तो मैदानात पुन्हा एकदा आपल्या बॅटने धमाका करण्यासाठी सज्ज होईल. गेले काही महिने सूर्या फॉर्म शोधत आहे. त्याला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. टी२० विश्वचषकात सूर्याने केवळ एका सामन्यात चांगली कामगिरी केली. त्यानंतर तो सातत्याने फेल गेला. आता आयपीएलमध्येही त्याला फॉर्म सापडत नाहीये. पण आता त्याच्या घरात आगमन झालेल्या चिमुकलीच्या पायगुणाने त्याला फलंदाजीत सूर गवसेल अशी अपेक्षा चाहतावर्ग व्यक्त करताना दिसत आहे. या नवीन प्रवासासाठी क्रिकेट विश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Good News! Indian T20 Captain Suryakumar Yadav blessed with baby girl.

Web Summary : Suryakumar Yadav and his wife Devisha Shetty are blessed with a baby girl. Yadav, occupied with IPL 2026, stayed in Mumbai with his family. After eight years of marriage, the couple welcomes their first child. Fans and the cricket world are congratulating the couple.
टॅग्स :सूर्यकुमार यादवआयपीएल २०२६मुंबई इंडियन्सभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघटी-20 क्रिकेट