Join us
Daily Top 2Weekly Top 5

नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 17:03 IST

Gold Mining Cost Hike : इराण युद्धामुळे डिझेल आणि स्फोटकांचे दर वाढल्याने सोन्याचे खाणकाम महागले आहे. गोल्ड फील्ड्स कंपनीने उत्पादन खर्चात ४०-५० डॉलर वाढीचा अंदाज वर्तवला आहे.

जागतिक बाजारात सोन्याच्या दरांनी उच्चांक गाठलेला असतानाच, आता सोने खाणीतून बाहेर काढण्याचा खर्चही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध खाणकाम कंपनी 'गोल्ड फील्ड्स'ने दिलेल्या माहितीनुसार, इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन आणि स्फोटकांच्या किमती वाढल्याने सोन्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. होर्मुज सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला, ज्याचा थेट फटका खाण उद्योगाला बसला आहे. खाणींमधून माल वाहून नेण्यासाठी लागणाऱ्या डिझेलच्या दरात मोठी ७०% वाढ झाली आहे. लॉजिस्टिक आणि मालवाहतुकीचा खर्च ४० टक्क्यांनी वाढला आहे.

स्फोटक आणि सायनॉइड
सोन्याच्या प्रक्रियेसाठी लागणारे स्फोटक आणि सायनाइड यांच्या किमतीत १०% वाढ झाली आहे. सायनाइड हे नैसर्गिक वायूपासून तयार केले जाते, ज्याचे दर ३० टक्क्यांनी वधारले आहेत.

सोन्याचे उत्पादन आणि खर्च
कंपनीने स्पष्ट केले की, जर कच्च्या तेलाची किंमत १०० डॉलर प्रति बॅरल राहिली, तर सोने काढण्याचा खर्च प्रति औंस ४० ते ५० डॉलरने वाढू शकतो. एप्रिल अखेरपर्यंत तेलाचे दर १२६ डॉलरपर्यंत पोहोचले होते, जे आता ट्रम्प यांच्या शांतता कराराच्या शक्यतेमुळे १०० डॉलरच्या खाली आले आहेत.

उत्पादन: २०२६ च्या पहिल्या तिमाहीत ६.३३ लाख औंस सोन्याचे उत्पादन झाले आहे.

लक्ष्य: २०२६ अखेरपर्यंत २४ ते २६ लाख औंस सोन्याच्या उत्पादनाचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे.

खर्च नियंत्रणासाठी नवीन तंत्रज्ञान
वाढत्या खर्चाला तोंड देण्यासाठी गोल्ड फील्ड्स आता अधिक इंधन-कार्यक्षम यंत्रणा आणि उच्च क्षमतेची मालवाहतूक प्रणाली वापरत आहे. चिलीतील 'सालारेस नॉर्टे' खाणीतील वाढीव उत्पादनामुळे ऑस्ट्रेलिया आणि घाना येथील खाणींमधील तुटीची भरपाई करणे शक्य झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold mining costs soar due to Iran war fuel price hike.

Web Summary : Rising fuel and explosives prices, triggered by the Iran war, are significantly increasing gold mining costs. Gold Fields reports diesel costs up 70%, logistics up 40%. Production expenses could rise $40-50/ounce if oil stays at $100/barrel. The company aims for increased efficiency to offset costs.
टॅग्स :सोनंइंधन टंचाईइंधन दरवाढ