Shani Jayanti 2026 Date: मराठी वर्षाचा दुसरा वैशाख महिना सुरू आहे. वैशाख महिन्याच्या सांगतेला म्हणजेच वैशाख अमावास्या या दिवशी शनैश्चर जयंती म्हणजेच शनि जयंती आहे. यंदाची वैशाख अमावास्या दर्श अमावास्या, भावुका अमावास्या असणार आहे. विशेष म्हणजे २०२६ मधील शनि जयंती ही शनिवारी आहे. शनिवार या दिवसावर शनिचा अंमल असल्याचे मानले जाते. यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेकपटींनी वाढले आहे.
नवग्रहातील अत्याधिक आणि विशेष महत्त्वाचा मानला गेलेला ग्रह म्हणजे शनि. पुराणात शनिबाबत अनेक मान्यता, कथा प्रचलित आहेत. शनि हा सूर्यपूत्र असल्याचे सांगितले जाते. शनि हे वडिलांचे विद्रोही, महादेव शिवशंकराचे परमभक्त व माता प्रिय असल्याचे म्हटले जाते. शंकराने शनिला नवग्रहांचा न्यायाधीश केले, अशी मान्यता प्रचलित आहे. खगोलशास्त्रीय विचार केल्यास शनि हा सूर्यमालेतील सहावा ग्रह आहे. शनिला स्वतःभोवती प्रदक्षिणा घालण्यास १० तास १४ मिनिटे लागतात. शनिला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास ३० वर्षे लागतात. शनि एका राशीत सुमारे २.५ वर्षे म्हणजे ३० महिने वास्तव्य करतो. शनि हा रविपुत्र व यमाचा मोठा भाऊ आहे. शनिला त्याच्या गतीमुळे मंद हे नाव प्राप्त झाले आहे.
यंदा २०२६ मध्ये शनि जयंती कधी आहे?
वैशाख अमावास्या शनि जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी सूर्यपुत्र असलेल्या शनिचा जन्म झाला होता, अशी मान्यता आहे. शनि हा नवग्रहांपैकी महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनि हा न्यायाचे प्रतीक मानला जातो. यंदा, शनिवार, १६ मे २०२६ रोजी शनैश्चर जयंती आहे. याच दिवशी वैशाख अमावास्येचे व्रतही केले जाणार आहे. यानंतर लगेचच ज्येष्ठ अधिक मास सुरू होत आहे. शनि हा न्यायाधीशाच्या भूमिकेत असल्यामुळे माणसाच्या कर्माचा सर्व ताळेबंद त्याकडे असतो. माणसाच्या कर्मानुसार तो यश देतो. तो कधी कुणावर अन्याय करत नाही, असे म्हटले जाते.
मन स्वच्छ व शुद्ध करणारा, उच्चप्रतिला नेणारा शनि
शनि हा दुःख, दैन्य कारक ग्रह मानला जातो. शनि साडेसाती तर सर्वांनाच परिचित आहे. साडेसाती योग हा शनिचा विशेष अधिकार आहे. शनि हा माणसाचे मन स्वच्छ व शुद्ध करणारा, मनातील घाण व कुविचार टाकून उच्चप्रतिला नेणारा हा एकच ग्रह आहे. शिस्तीचा पाईक आहे. जीवनाचे मर्म जाणणारा व कटू सत्य उगड करुन सांगणारा आहे. जे याची अवज्ञा करतात त्यांना तो खाली ओढतो व माणसाच्या अहंकाराचा नाश करतो. जे शिस्तबद्ध, विनयशील, नम्र आहेत, त्यांना उच्च शिखरावर नेऊन बसवतो, अशी शनिची ख्याती सांगितली जाते.
शनैश्चर जयंतीला करायचे खास उपाय
यंदाची शनि जयंती शनिवारी येणे अतिशय शुभ मानले गेले आहे. या दिवशी शनि सेवा केल्यास त्याचे पुण्य फल लाभू शकते, असे म्हटले जात आहे. शनैश्चर जयंतीला आवर्जून शनि मंदिरात जावे. शनि महाराजांना काळे तीळ, तेल अर्पण करावेत. शनि जयंतीला पिंपळाच्या झाडाशी जल अर्पण करून दिवा दाखवावा. शनि जयंतीला शनि संबंधित वस्तू काळे वस्त्र, काळे तीळ, मोहरीचे तेल यांचे दान करावे. शनि मंत्राचा जप करावा. शनैश्चर स्तोत्र, शनि चालीसा यांचे पठण करावे.
शनि जयंतीला हनुमंतांची उपासना लाभदायक
शनिला लंकापती रावणाने उलटे पाडून आपल्या पायाखाली ठेवले होते, तोपर्यंत रावणाला साडेसातीची भीती नव्हती. हनुमानाने लंकादहनावेळी शनिला मुक्त केले. शनिची दृष्टी रावणावर पडली आणि रावणाची दुर्दशा सुरू झाली, अशी एक कथा सांगितली जाते. त्यामुळे शनि जयंतीला आवर्जून हनुमानाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. हनुमानाचे पूजन, नामस्मरण करावे. हनुमान चालिसा म्हणावी. हनुमानाच्या प्रभावी मंत्राचा यथाशक्ती जप करावा, असे म्हटले जाते.
साडेसाती, ढिय्या सुरू आहे? शनि जयंतीची सुवर्ण संधी सोडू नका
आताच्या घडीला शनि मीन राशीत विराजमान आहे. जून २०२७ पर्यंत शनि याच राशीत असणार आहे. यामुळे कुंभ, मीन आणि मेष या तीन राशींची साडेसाती सुरू आहे. तसेच सिंह आणि धनु या राशींवर शनि ढिय्या सुरू आहे. शनि साडेसाती आणि शनि महादशा असणाऱ्या व्यक्तींनी शनैश्चर जयंतीचा सुवर्ण योग सोडू नये. ही सुवर्ण संधी मानून या दिवशी शक्य तेवढी शनि सेवा करावी. या दिवशी शनि उपासना, नामस्मरण, आराधना, जपजाप करावेत. यामुळे शनिचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत होते, अशी मान्यता आहे. याशिवाय शनि जयंती दिनी महादेव शिवशंकर, हनुमान, श्रीकृष्ण यांचे केलेले पूजन, नामस्मरण शनि प्रभावापासून दूर ठेवण्यास सहाय्यभूत होते, असे सांगितले जाते.
Web Summary : Shani Jayanti falls on May 16, 2026, a Saturday, coinciding with Vaishakh Amavasya. It's auspicious for those under Shani's influence (Sade Sati, Dhaiya). Offerings, prayers to Hanuman, Shiva, and Krishna provide relief. Donate black items and chant Shani mantras for blessings.
Web Summary : शनि जयंती 16 मई, 2026 को वैशाख अमावस्या के साथ शनिवार को है। यह शनि के प्रभाव (साढ़े साती, ढैय्या) वाले लोगों के लिए शुभ है। हनुमान, शिव और कृष्ण को प्रार्थना करने से राहत मिलती है। काले वस्तुओं का दान करें और शनि मंत्रों का जाप करें।