शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 17:28 IST

1 / 12
Who Is Governor Rajendra Arlekar: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम अर्थात टीव्हीके पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मात्र, कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राज्यात 'त्रिशंकू' स्थिती निर्माण झाली आहे. सर्वांत मोठा पक्ष असलेल्या टीव्हीके यांनी राज्यपालांची भेट घेतली खरी, परंतु, बहुमत नसल्याने सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे.
2 / 12
बहुमताचा आकडा असलेल्या आमदारांची संख्या असलेले पत्र घेऊन येण्याबाबत राज्यपालांनी अभिनेता विजय यांना सांगितल्याचे म्हटले जात आहे. यावरून राज्यपालांवर टीका केली जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर कोण आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.
3 / 12
विजय यांच्या पक्षाने १०८ जागा जिंकल्या आहेत. तामिळनाडू विधानसभेच्या एकूण २३४ जागांपैकी सरकार स्थापनेसाठी ११८ जागांचे बहुमत आवश्यक आहे. सरकार स्थापनेसाठी विजय यांना अजून ११ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. अभिनेता विजय यांनी अद्याप ११८ आमदारांचे पाठिंब्याचे पत्र सादर केलेले नाही.
4 / 12
बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ आपल्याकडे असल्याचे त्यांनी तोंडी सांगितले. टीव्हीकेने १०७+५ म्हणजेच ११२ आमदारांच्या सह्या असलेले पत्र राज्यपालांना सादर केले होते. मात्र, राज्यपालांनी, कृपया ११८ सह्या (बहुमत) घेऊन परत या, असा प्रतिसाद दिला. यासाठी टीव्हीके यांनी काही वेळ मागितला आहे. यानंतर महाराष्ट्रापासून ते तामिळनाडूपर्यंतच्या विरोधकांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकरांवर टीका केली.
5 / 12
तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर कोण आहेत, ते जाणून घेऊया... संघ-भाजपाची पार्श्वभूमी असेल्या राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे मार्च २०२६ मध्ये तमिळनाडूच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. राजेंद्र आर्लेकर यांचा जन्म २३ एप्रिल १९५४ रोजी गोव्यातील पणजीमध्ये झाला.
6 / 12
राजेंद्र आर्लेकर यांनी गोव्यातील वास्को द गामा येथील सेंट जोसेफ इन्सिट्यूटमधून मॅट्रिक पूर्ण केले. पुढे एमईएस कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. लहानपणीच त्यांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आला. १९८९ साली त्यांनी भाजपाचे सक्रिय सदस्य म्हणून कामाला सुरुवात केली. त्यांनी चार वर्ष गोवा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केले.
7 / 12
गोव्याचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक आणि लक्ष्मीकांत पारसेकर यांच्या कार्यकाळात तयार झालेल्या नेत्यांपैकी आर्लेकर एक आहेत. एकाबाजूला मनोहर पर्रीकर हे लोकनेते आणि मुख्यमंत्री म्हणून उदयाला येत असताना आर्लेकर मात्र संघटनेचे नेते म्हणून ओळखले गेले.
8 / 12
राजेंद्र आर्लेकर यांनी गोव्यातील पक्षसंघटनेमध्ये विविध पदे भूषविली आहेत. सन २००२ मध्ये वास्को विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले होते. सन २००७ साली पराभव राजेंद्र आर्लेकर यांचा पराभव झाला. सन २०१२ मध्ये राजेंद्र आर्लेकर पुन्हा निवडून आले. याच वर्षी गोव्याच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
9 / 12
विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात कागदविरहीत कामकाज करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. कागदविरहीत कामकाजाला अनेक आमदारांचा सुरुवातीला विरोध होता. मात्र, राजेंद्र आर्लेकर यांनी प्रयत्न सुरू ठेवले आणि २०१५ मध्ये गोवा ही देशातील पहिली कागदविरहीत कामकाज करणारी विधानसभा बनली.
10 / 12
यानंतर सन २०२१ साली आर्लेकर हिमाचल प्रदेशचे २१ वे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांनी बिहारचे राज्यपाल पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर २०२५ साली केरळचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली. पुढे तमिळनाडूची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.
11 / 12
भाजपाचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आडमुठी भूमिका घेतली आहे. सर्वात मोठा पक्ष ठरूनही त्यांनी टीव्हीकेला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले नाही. हे घटनात्मकदृष्ट्या चुकीचे आहे. १०८ जागा मिळूनही सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करणार नसाल तर तुम्ही भंपक आणि खोटारडे आहात. भाजपाने देशभरात सगळे कोश्यारीच नेमलेत. कुणी धोतर नेसले आहे तर कुणी सुटा-बुटात आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली.
12 / 12
दरम्यान, तमिळनाडू राज्यात राज्यपाल विरुद्ध राज्यकर्ते असा जुना वाद आहे. माजी राज्यपाल आरएन रवी यांनी एमके स्टॅलिन सरकारची १० विधेयके राष्ट्रपतींच्या विचारार्थ अडवून ठेवली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांची ही कृती बेकायदेशीर असल्याचे म्हटले आणि विधेयके मंजूर केली. भाषा, संस्कृती आणि राजकीय मुद्दे यावरूनही आरएन रवी आणि माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यात अनेकदा खटके उडाले होते.
टॅग्स :Assembly Electionविधानसभा निवडणूक २०२६TamilnaduतामिळनाडूThalapathy Vijayथलपती विजयPoliticsराजकारण