हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
By किरण शिंदे | Updated: May 15, 2026 13:05 IST2026-05-15T13:05:18+5:302026-05-15T13:05:43+5:30
Pune Crime - पुणे एटीएसच्या पथकाने नागपूर रेल्वे स्थानकावर सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले.

हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
पुणे - हडपसर परिसरात आढळलेल्या बॉम्ब प्रकरणात पुणे दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात नागपूर येथून एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे एटीएसच्या पथकाने नागपूर रेल्वे स्थानकावर सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले. हडपसरमधील बॉम्ब प्रकरणाच्या तपासादरम्यान त्याचा संबंध समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, संशयित आरोपीला पुढील चौकशीसाठी पुण्यात आणण्यात येणार असून, या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तपास यंत्रणांकडून अधिक गोपनीयतेने तपास सुरू आहे. हडपसर परिसरातील खासगी रुग्णालयात संशयास्पद बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली होती.
बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, स्थानिक पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला होता. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पुणे एटीएसकडून सुरू असून, लवकरच आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.