पंचनामे पूर्ण! राज्यात ३४ जिल्ह्यांमध्ये तब्बल ६१ लाखांहून अधिक हेक्टरचे नुकसान, आता प्रतीक्षा मदतीच्या शासन निर्णयाची
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 14:09 IST2025-10-17T14:09:14+5:302025-10-17T14:09:28+5:30
राज्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीने तब्बल ३४ जिल्ह्यांमध्ये हाहाकार उडाला असून हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकांचा घास या अतिवृष्टीने हिरावून नेला

पंचनामे पूर्ण! राज्यात ३४ जिल्ह्यांमध्ये तब्बल ६१ लाखांहून अधिक हेक्टरचे नुकसान, आता प्रतीक्षा मदतीच्या शासन निर्णयाची
पुणे : राज्यात अतिवृष्टीमुळे सप्टेंबर महिन्यात शेती व पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये तब्बल ६१ लाखांहून अधिक हेक्टरचे नुकसान झाल्याचे या अहवालावरून स्पष्ट होत आहे. त्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक सव्वासात लाखांहून अधिक हेक्टरचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनुसार यात आणखी किमान तीन लाख हेक्टरची वाढ होऊ शकते. त्यामुळे अंतिम नुकसानीची आकडेवारी शुक्रवारी (दि. १७) जाहीर करण्यात येणार आहे.
राज्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीने तब्बल ३४ जिल्ह्यांमध्ये हाहाकार उडाला होता. हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकांचा घास या अतिवृष्टीने हिरावून नेला. शेती पिकांसह अनेक जिल्ह्यांमध्ये जमीनही खरवडून गेल्याने शेतकरी अक्षरशः कोलमडून पडला. राज्य सरकारने याबाबत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महसूल कृषी व ग्रामविकास विभागाने केलेल्या एकत्रित पंचनाम्यानुसार राज्यात ६१ लाख ११ हजार २२३ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार नुकसान भरपाईची मर्यादा दोन हेक्टरवरून तीन हेक्टर करण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वीच काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे पूर्ण झाले होते. त्यामुळे या जिल्ह्यांमधील बाधितांच्या अतिरिक्त एक हेक्टरचा समावेश या पंचनाम्यामध्ये करण्यात येत आहे. त्यामुळे अंतिम आकडेवारीत आणखी किमान तीन लाख हेक्टरची वाढ होऊ शकते, अशी माहिती या सूत्रांनी दिली.
दरम्यान, राज्यात सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यात झाल्याचे या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. या जिल्ह्यात ७ लाख २१ हजार ७४ हेक्टरचे नुकसान झाले असून त्या खालोखाल अहिल्यानगर जिल्ह्यात ६ लाख २६ हजार १८६ हेक्टरचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. सोलापूर आणि संभाजीनगर जिल्ह्यातही प्रत्येकी सहा लाखांहून अधिक हेक्टरचे नुकसान झाले आहे.
नुकसानीचा हा एकत्रित अहवाल राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे गेल्यानंतर एकूण बाधित क्षेत्र शेतकऱ्यांची संख्या आणि त्यासाठी लागणारा मदत निधी याबाबत स्वतंत्र शासन निर्णय काढला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री कृषीमंत्री यांनी शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत दिवाळीपूर्वीच खात्यात जमा करण्यात येईल, असे आश्वासित केले आहे. मात्र शुक्रवारपासून दिवाळीच्या सणाला प्रारंभ होत आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार शुक्रवारी दिवसअखेर बाधित क्षेत्र, शेतकऱ्यांची संख्या आणि मदत निधीची आकडेवारी अंतिम होणार आहे. त्यानंतर शनिवारी या मदती संदर्भातला शासन निर्णय जारी झाल्यास सोमवारपर्यंत मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या अहवालानंतर शासन निर्णयाची प्रतीक्षा आहे.
जिल्हा एकूण बाधीत क्षेत्र (हे.)
ठाणे ९४८१
पालघर १३७४४
रायगड ५८३०
रत्नागिरी १०४
सिंधुदुर्ग ७५
नाशिक २९९८०७
धुळे ११५९४
जळगाव २५९०८८
नंदुरबार ४४५
अहिल्यानगर ६२६१८६
पुणे २१९५२
सोलापूर ६०४६४१
सांगली ९५०८७
सातारा ४२१९
कोल्हापूर १६९७
छ. संभाजीनगर ६०७५१९
जालना ४४९२८२
बीड ७२१०७४
लातूर २७८४३५
धाराशिव ३११२९१
नांदेड ३२०७३
परभणी ३४३८८८
हिंगोली ५५३७३
बुलढाणा ३३३६९४
अमरावती ३५९०१
अकोला १९९५६४
वाशिम ४५१९८
यवतमाळ ३७३५५२
वर्धा १८४७३३
नागपूर ८७१७०
भंडारा ६४२५
गोंदिया २३१०
चंद्रपूर ८७६४२
गडचिरोली २१४९
एकूण राज्य ६१११२२३