'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 05:51 IST2026-05-15T05:48:41+5:302026-05-15T05:51:32+5:30
NEET Exam Paper Leak Updates: सीबीआयचे देशभरात छापे : पेपरफुटी नेमकी कुठून झाली, याचा शोध सुरू; डिजिटल पुरावे जप्त

'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
नवी दिल्ली/मुंंबई/ लातूर/पुणे/ अहिल्यानगर : नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लातूरमधून प्राध्यापकाला व अहिल्यानगरमधून एकास अटक केली. राष्ट्रीय परीक्षण संस्था (एनटीए) व प्रश्नपत्रिका छपाई प्रक्रियेशी संबंधित काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.
सीबीआयच्या पथकाने पुणे व लातूर येथे वास्तव्याला असलेले निवृत्त प्रा.पी.व्ही. कुलकर्णी यांना गुरुवारी लातूरच्या घरातून ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशी केल्यानंतर पथक त्यांना सोबत घेऊन पुण्याकडे रवाना झाले.
सीबीआयने अहिल्यानगर येथील धनंजय लोखंडे आणि पुण्यातील मनीषा वाघमारे यांना अटक केली आहे. नीट परीक्षेच्या प्रक्रियेच्या दरम्यान मनीषा यांच्याकडे २१ वेगवेगळ्या बँक खात्यांतून लाखो रुपये जमा झाले होते, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.
लातूर पोलिसांनी समुपदेशक, विद्यार्थी, पालक आणि कोचिंग क्लासेसमधील सहा जणांची चौकशी करून जबाब घेतले आहेत. त्यात मिळालेल्या माहितीची गुरुवारीही पडताळणी सुरू होती.
सीबीआयने २४ तासांत देशभरातील १४ ठिकाणी छापे टाकले. प्रश्नपत्रिका नेमकी कुठून फुटली, याचा शोध घेण्यावर तपास यंत्रणेचा मुख्य भर आहे. यात सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सीबीआयच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
यापूर्वी अटक केलेल्या पाच आरोपींना दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चौकशीसाठी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सीबीआयने जप्त केलेल्या डिजिटल उपकरणांच्या तपासातून चॅट्स, लीक झालेल्या प्रश्नपत्रिका व इतर महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. त्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे.
पेपरफुटीनंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (एनटीए) कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. एनटीएची पुनर्रचना अथवा त्याऐवजी स्वतंत्र, स्वायत्त परीक्षा यंत्रणा स्थापन करण्याची मागणी केली आहे.
लातूरचा प्राध्यापक पेपर सेटिंग प्रक्रियेत?
गुरुवारी पहाटेच सीबीआयचे पथक लातुरात धडकले होते. त्यांनी प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांच्या पद्मावती नगर येथील घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले. दुपारपर्यंत त्यांची चौकशी झाली. त्यांचे पुणे येथेही घर आहे. कुलकर्णी हे केमिस्ट्री विषयतज्ज्ञ असून, नीट पेपर सेटिंग प्रक्रियेत ते सहभागी होते, अशी चर्चा आहे.
नीट रद्द झाल्याचा धक्का; विद्यार्थ्याची आत्महत्या
नीट परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या मानसिक तणावातून उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे एका २१ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी समोर आली. रितिकचा मृतदेह घरातील बंद खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
राजस्थान आणि गुरुग्राम कनेक्शन उघड
या प्रकरणात सीबीआयने यापूर्वी जयपूरमधील मंगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल यांना अटक केली होती. तसेच गुरुग्राममधील यश यादव आणि नाशिकमधील शुभम खैरनार यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
शुभम खैरनारने एप्रिल महिन्यात यश यादवला मंगीलाल बिवाल हा आपल्या धाकट्या मुलासाठी प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी १० ते १२ लाख रुपये देण्यास तयार असल्याची माहिती दिली होती.
खैरनारने यादवला ५०० ते ६०० प्रश्न पुरवले. या प्रश्नांच्या आधारे नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक गुण मिळू शकले असते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
१० लाखांचा व्यवहार, प्रश्नपत्रिका नातेवाइकांना
मंगीलाल बिवालने ही प्रश्नपत्रिका यादवकडून मिळवली. राजस्थानातील सीकर येथे नीट कोचिंगदरम्यान यादवची ओळख विकास बिवालशी झाली होती. प्रश्नपत्रिकेतील १५० प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत जुळल्यास १० लाख रुपये देण्याचा व्यवहार ठरल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
मंगीलाल बिवालने प्रश्नपत्रिका आपल्या मुलासोबत काही नातेवाईकांनाही दिल्याचा आरोप आहे. तसेच यादवने विकास बिवालला आणखी उमेदवार शोधण्यास सांगितले होते, जेणेकरून प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी खर्च झालेली रक्कम वसूल करता येईल.