जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 06:07 IST2026-05-15T06:05:31+5:302026-05-15T06:07:39+5:30
पटेलला १९ तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पटेल हे खार (प.) ला राहत असून त्याचे कार्यालय वांद्रे (प.) येथे आहे.

जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
मुंबई : अभिनेता जावेद जाफरी यांची पत्नी हबीबा जाफरी यांची मालमत्ता गुंतवणुकीच्या आमिषाने सुमारे १८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल वादग्रस्त सहायक पालिका आयुक्त महेश पाटील यांच्यासह व्यावसायिक निशित पटेल विरुद्ध मुंबई पोलिसांच्या गुन्हा शाखेच्या मालमत्ता कक्षाने गुन्हा दाखल करून पटेलला बेड्या ठोकल्या आहेत. पाटीलसह त्यांच्या तीन-चार साथीदारांचा शोध सुरू आहे.
यामध्ये फसवणुकीचे मोठे रॅकेट आहे का, याचाही तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. पटेलला १९ तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पटेल हे खार (प.) ला राहत असून त्याचे कार्यालय वांद्रे (प.) येथे आहे. त्याचे बँक व्यवहार, आर्थिक कागदपत्रे आणि संबंधितांमधील संवाद तसेच अन्य पुराव्यांच्या मदतीने मालमत्ता कक्षाकडून पुढील तपास सुरू आहे.
हबीबा यांच्या तक्रारीनुसार, ही फसवणूक २०२४ पासून केली असून १५.३३ कोटी रुपये ऑनलाइन तर उर्वरित रोख स्वरूपात देण्यात आले आहेत. मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणुकीच्या बदल्यात चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात काहीही दिले नसल्याचा आरोप आहे.
सहायक पालिका आयुक्ताची बदली अन् क्रीम पोस्टिंग
पटेलने भांडुप एस वाॅर्डचे तत्कालीन सहायक आयुक्त महेश पाटील यांच्यावर वांद्रे पुनर्विकास प्रकल्पात ८० कोटी रुपये गुंतवणूक घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तेच सूत्रधार असून आपल्याला बळीचा बकरा केला जात असल्याचे त्याचे म्हणणे होते.
या प्रकल्पात अनेक बड्या अधिकाऱ्यांना आकर्षक रकमेच्या गुंतवणुकीचे आमिष दाखवून २० ते ३० कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप पटेलने केला होता. त्याने पुरावे देत पालिका, मुंबई पोलिसांसह सर्व यंत्रणांकडे तक्रारही केली होती.
पाटील यांनी पटेलचे सर्व आरोप फेटाळले होते. पण या तक्रारीनंतर तत्कालीन महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पाटील यांना २९ नोव्हेंबर २०२५ रोजी एक महिना सक्तीच्या रजेवर पाठविले होते. त्यानंतर बदली करीत आठवडाभरात त्यांना नवी जबाबदारी देण्यात आली होती. ते सध्या के उत्तर विभागात कार्यरत आहेत.