‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 06:32 IST2026-05-15T06:30:27+5:302026-05-15T06:32:09+5:30

जागतिक शांततेवर भर देण्याचा चीनचा आग्रह: डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात गुरुवारपासून बीजिंगमध्ये अत्यंत महत्त्वाची दोन दिवसीय शिखर परिषद सुरू झाली.

'Don't be a competitor, let's be partners; no one wins in a trade war', Xi Jinping tells Trump | ‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या

‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या

बीजिंग : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात गुरुवारपासून बीजिंगमध्ये अत्यंत महत्त्वाची दोन दिवसीय शिखर परिषद सुरू झाली आहे. ९ वर्षांनंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हा पहिलाच चीन दौरा असून, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये रचनात्मक स्थिरता आणणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. गुरुवारी सकाळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दोन तास बंद दाराआड चर्चा झाली. इस्रायल-इराण युद्ध, जागतिक ऊर्जा संकट, तंत्रज्ञान आणि व्यापार यांसारख्या गंभीर विषयांवर या बैठकीत विस्तृत मंथन झाले.

चीनशी सुरू असलेल्या व्यापार युद्धाला पूर्णविराम आणि व्यापारी संबंध सुधारण्यावर ट्रम्प भर देत आहेत. चीनने अमेरिकेकडून अधिक प्रमाणात कृषी उत्पादने आणि प्रवासी विमाने खरेदी करावीत, अशी अमेरिकेची इच्छा आहे. 

गेल्या वर्षी ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात लावलेल्या शुल्कांमुळे दोन्ही देशांत मोठे व्यापार युद्ध पेटले होते. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये आणि मतभेद शांततेने सोडवले जावेत, यासाठी एक विशेष बोर्ड स्थापन करण्याचा प्रस्ताव ट्रम्प यांनी ठेवला आहे. 

व्यापार चर्चेबाबत बोलताना जिनपिंग यांनी दोन्ही बाजूंच्या आर्थिक पथकांच्या कामाचे कौतुक केले आणि व्यापार युद्धात कोणाचाही विजय होत नाही, अशी टिप्पणी केली.

होर्मुझ सामुद्रधुनीच्या नाकेबंदीवर उभय देशांत चर्चा 

सध्या सुरू असलेल्या इस्रायल-इराण युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट निर्माण झाले असून, त्याचा मोठा फटका आशियाई देशांना बसत आहे. इराणवर चीनचा मोठा राजकीय आणि आर्थिक प्रभाव आहे. त्यामुळे चीनने आपल्या प्रभावाचा वापर करून इराणला अमेरिकेच्या अटी मान्य करण्यास भाग पाडावे, आणि अत्यंत महत्त्वाची असलेली ‘होर्मुजची सामुद्रधुनी’ पुन्हा खुली व्हावी, अशी ट्रम्प यांची मुख्य अपेक्षा आहे.

मस्क आकर्षणाचे केंद्र 

या शाही मेजवानीत एलन मस्क हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. चीनच्या प्रसिद्ध ‘शाओमी’ कंपनीचे सीईओ लेई जुन यांच्यासह अनेक चिनी आणि आंतरराष्ट्रीय पाहुण्यांनी मस्क यांच्या टेबलजवळ जाऊन त्यांच्याशी हस्तांदोलन केले आणि सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

बडे उद्योजक सामील 

या शिखर परिषदेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे ट्रम्प यांच्यासोबत जागतिक कीर्तीच्या बड्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अब्जाधीश उद्योजक चीनमध्ये आले आहेत. यामध्ये टेस्ला आणि स्पेसएक्सचे एलन मस्क, ॲपलचे टिम कुक, एनवीडियाचे जेन्सन हुआंग आणि ब्लॅकरॉकचे लॅरी फिंक यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. चीन आपले दरवाजे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अधिक खुले करेल, अशी ग्वाही देत जिनपिंग यांनी या अमेरिकन कंपन्यांचे स्वागत केले. ट्रम्प यांनीही या कॉर्पोरेट नेत्यांना चीनसोबतचे सहकार्य वाढविण्याचे आवाहन केले आहे.

वर्षात चार वेळा भेट होणार

ट्रम्प आणि शी जिनपिंग २०२६ या एकाच वर्षात चार वेळा भेटण्याची शक्यता आहे. यामध्ये मियामी येथील ‘जी-२०’ परिषद, चीनच्या ग्वांगझू शहरात होणारी ‘अपेक’ शिखर परिषद या दोन प्रमुख आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा समावेश असेल. 

जिनपिंग यांना निमंत्रण

शी जिनपिंग २४ सप्टेंबरला अमेरिकेच्या दौऱ्यावर येत असल्याची घोषणा भव्य शासकीय मेजवानीदरम्यान ट्रम्प यांनी केली. ट्रम्प यांनी शी जिनपिंग आणि त्यांच्या पत्नी मॅडम पेंग यांना २४ सप्टेंबर २०२६ रोजी अधिकृत अमेरिका दौऱ्याचे आणि व्हाइट हाउसचे आमंत्रण दिले.

Web Title: 'Don't be a competitor, let's be partners; no one wins in a trade war', Xi Jinping tells Trump