सीसीटीव्हीत दिसणारा निर्दोष; बॉम्ब ठेवणाऱ्याचा शोध सुरूच, पुण्यातील बॉम्ब प्रकरणात नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 20:40 IST2026-05-14T20:34:45+5:302026-05-14T20:40:07+5:30

हॉस्पिटल आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेच पोलिसांनी ताब्यात घेतले असून, स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेची पथके आरोपीचा शोध घेत आहेत.

Innocent man seen in CCTV Search continues for bomb keeper what really happened in Pune bomb case? | सीसीटीव्हीत दिसणारा निर्दोष; बॉम्ब ठेवणाऱ्याचा शोध सुरूच, पुण्यातील बॉम्ब प्रकरणात नेमकं काय घडलं?

सीसीटीव्हीत दिसणारा निर्दोष; बॉम्ब ठेवणाऱ्याचा शोध सुरूच, पुण्यातील बॉम्ब प्रकरणात नेमकं काय घडलं?

हडपसर (पुणे): हडपसर येथील कामधेनु इस्टेट मधील उषाकिरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, हॉस्पिटलचे ॲडमिन कॉर्डीनेटर प्रमोद भागवत भालके (वय.28, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.13) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आला होता. दरम्यान, हॉस्पिटलमध्ये बॉम्ब मिळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद भालके आणि डॉ. विलास गायकवाड हे दोघे हॉस्पिटलमध्ये ॲडमीट असलेल्या रुग्णाची तपासणी करत होते. त्यावेळी सायंकाळचे सात वाजले होते. भालके व डॉ.गायकवाड हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर होते. त्यावेळी भालके यांना अतिदक्षता विभागाजवळील स्वच्छतागृहाची लाईट चालू दिसली. त्यामुळे डॉ. गायकवाड आणि भालके हे दोघे लाईट बंद करण्यासाठी गेले. डॉ. गायकवाड यांना त्यावेळी पुरूष स्वच्छता गृहाच्या आतमध्ये डाव्या बाजूला बॉश बेसिनच्याखाली एक बॉम्बसदृश्य वस्तू दिसली. त्यावर पांढऱ्या रंगाच्या चार नळकांड्या वायरच्या साह्याने जोडलेल्या होत्या. हे सर्व एका इलेक्ट्रीक घड्याळाला जोडण्यात आले होते.

डॉ. गायकवाड यांनी ती वस्तू उचलून पाहिली. त्यातून घड्याळासारखा टिक-टिक आवाज येत होता. 7 वाजून 21 मिनिटे अशी वेळ होती. डॉ. गायकवाड यांनी बॉम्बसदृश्य वस्तू एका रिकाम्या सलाईनच्या बॉक्समध्ये ठेवला. त्‍यानंतर तो बॉक्‍स भालके यांनी हॉस्पिटलच्या बाहेर मोकळ्या जागेत आणून ठेवला. यानंतर हडपसर पोलिसांना ही माहिती देण्यात आली होती.

बॉम्ब ठेवणारा व्यक्ती अद्यापही फरार 

माहिती मिळताच तत्काळ हडपसर पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने सुरक्षीतपने तो बॉम्ब हॉस्पिटच्या परिसरातून बाहेर काढून ग्लायडींग सेंटर येथे 9 वाजण्याच्‍या सुमारास निकामी केला. रात्री पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त डॉ. सागर कवडे, विवेक मासाळ, यांनी घटनास्थळी भेट दिली. तर पुणे दहशतवाद विरोधी (एटीएस) पथकाने देखील पाहणी केली. अद्याप हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवणारा व्यक्ती पोलिसांना मिळून आलेला नाही. हॉस्पिटल आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेच पोलिसांनी ताब्यात घेतले असून, स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेची पथके आरोपीचा शोध घेत आहेत.

त्याने बॉम्ब ठेवलाच नाही 

पोलिसांचा तपास विविध अँगलने सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेला दुचाकीस्वार स्वतःहून पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. सोशल मीडियावर संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला व त्याच्या नातेवाईकांना ही बाब समजली. त्यानंतर त्याने पोलिसांसमोर हजर होत आपली बाजू मांडली. त्याच्याकडे काही संशयास्पद सापडले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. जेथे टॉयलेट मध्ये वस्तू ठेवली होती. ते सील केले आहे.

Web Title: Innocent man seen in CCTV Search continues for bomb keeper what really happened in Pune bomb case?