जामीन दिल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो; ऋषिकेश वैद्यचा जामीन अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 17:54 IST2026-05-18T17:54:05+5:302026-05-18T17:54:53+5:30
अर्जदार जामीन मिळण्यासाठी आवश्यक असलेला 'वरकरणी' आधार सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे आणि तो जामीन मिळण्यास पात्र नसल्याने न्यायालयाने जामीन फेटाळला

जामीन दिल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो; ऋषिकेश वैद्यचा जामीन अर्ज फेटाळला
पुणे: देवी शक्तीचा संचार असल्याची बतावणी करत लैंगिक अत्याचार केलेल्या भोंदू ऋषिकेश वैद्यचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.पी. रागीट यांनी फेटाळला. या प्रकरणातील गांभीर्य, तथ्य व परिस्थिती लक्षात घेता जामीन फेटाळल्याचे आदेशात म्हटले आहे.
न्यायालयीन कोठडीत असताना वैद्य याने जामिनासाठी अर्ज केला. या अर्जास सरकारी वकील ॲड. लीना पाठक, फिर्यादीचे वकील ॲड. रोहन नहार यांनी विरोध केला. ॲड. नहार यांना ॲड. ओंकार फडतरे, ॲड. गायत्री पोटवडे आणि ॲड. चैतन्य अभंग यांनी सहकार्य केले. हा गुन्ह गंभीर स्वरूपाचा आहे. वैद्य याने धार्मिक गुरू म्हणून असलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत पीडितेवर बलात्कार केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप दोषारोपपपत्र दाखल झालेले नाही. त्यामुळे आरोपीला जामीन दिल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, अशी भीती तपास अधिकारी आणि फिर्यादी यांनी व्यक्त केली. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी करण्यात आली. गुन्ह्यांचे गांभीर्य आणि या प्रकरणातील तथ्ये व परिस्थिती विचारात घेता, असे निष्पन्न होते की, अर्जदार जामीन मिळण्यासाठी आवश्यक असलेला 'वरकरणी' आधार सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे आणि तो जामीन मिळण्यास पात्र नाही असे सांगत न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला.
ही घटना डिसेंबर २०२३ ते ११ मे २०२५ या कालावधीत घडली. २७ मार्च २०२६ मध्ये हडपसर पोलिसात याबाबत गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार पोलिसांनी २८ मार्च रोजी त्याला अटक केली. सुरूवातीला पोलीस कोठडी, त्यानंतर तो आता न्यायालयीन कोठडीत आहे. नाशिक येथील कॅप्टन अशोक खरातचे प्रकरण राज्यभर गाजत असतानाच शहरातील हा प्रकार उघडकीस आला होता. पीडितेची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर मी देवाचा भक्त असून, तुला उपासना अशी करायची, हे शिकवितो असे सांगून महिलेला जाळ्यात खेचले. तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.