मोबाइल चॅटिंगबाबत विचारणा केल्याने नवऱ्याने पत्नीचा दाबला गळा, पुण्यातील संतापजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 13:22 IST2026-05-05T13:19:49+5:302026-05-05T13:22:33+5:30
पत्नी आणि मुलाला त्याने बॅटने मारहाण केली, तसेच पत्नीचा गळा आवळून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल चॅटिंगबाबत विचारणा केल्याने नवऱ्याने पत्नीचा दाबला गळा, पुण्यातील संतापजनक घटना
पुणे : मोबाइलवरील चॅटिंगबद्दल विचारणा केल्याने पत्नीचा गळा दाबत, मुलाला बॅटने मारहाण करण्यात आल्याची घटना पुणे स्टेशन परिसरातील क्वीन्स गार्डन येथे घडली. पत्नीचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी विजय फुलचंद कारंडे (वय ४०, रा. क्वीन्स गार्डन, पुणे स्टेशनजवळ) असे आरोपीचे नाव आहे. कारंडे याने केलेल्या मारहाणीत पत्नी रूपाली (वय ३०) आणि मुलगा जखमी झाले आहेत. याबाबत पत्नीने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास क्वीन्स गार्डन परिसरातील आरोपीच्या घरात ही घटना घडली. आरोपी मोबाइलवर चॅटिंग करत होता. त्यावेळी पत्नीने त्याला जाब विचारला. या कारणावरून त्याने पत्नीला शिवीगाळ केली. पत्नी आणि मुलाला त्याने बॅटने मारहाण केली, तसेच पत्नीचा गळा आवळून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे करीत आहेत.