Pune Rain: पुण्यात पावसाचं थैमान! उपनगर, ग्रामीण भागात मुसळधार, रस्त्यांवर नदी, घरात शिरले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 12:43 IST2025-09-15T12:42:37+5:302025-09-15T12:43:47+5:30
पुणे जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातलेलं पाहायला मिळत असून कालपासून संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरूवात झालेली आहे

Pune Rain: पुण्यात पावसाचं थैमान! उपनगर, ग्रामीण भागात मुसळधार, रस्त्यांवर नदी, घरात शिरले पाणी
पुणे : बऱ्याच दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल रात्रीपासून जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहरासह उपनगर, ग्रामीण भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आले आहे. अनेक भागात घरातही पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत सुरु आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आता कुठे पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतलेली पाहायला मिळते. मात्र घाटमाथ्याचा जो परिसर आहे त्याठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे.
मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. स्थानिक शाळाने हा निर्णय घेऊन मुलांना सुट्टी दिली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांना चालवण्यास अडथळे येत आहेत. पुणे सोलापूर रोड लोणी काळभोर या ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. काही घरांमध्ये पाणी शिरले आहे.
ग्रामीण भागातील शिरूर, आंबेगाव, मुळशी, तालुक्यात तालुक्याला रविवार रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपले आहे. या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. परिणामी काही क्षणात येथील शेतीचे बांध, ताली फुटून पाणी वाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर ओढे काठ सोडून शेतातून वाहू लागले आहेत. येथील तळे तुडुंब भरून सांडव्यावरून वाहत आहेत. या परिसरातील शेत रस्ते पाण्याखाली गेल्याने पूर्ण बंद झाले आहेत.
खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रामध्ये विसर्ग करण्यात येतोय. काल संध्याकाळपासून दहा हजार क्युसेकने मुठा नदीच्या पत्रामध्ये खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येत होतं. ते आता सकाळी दहा नंतर तो विसर्ग वाढून चौदा हजार पाचशे करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता मुठा नदी दुथडी भरून वाहायला लागलेली आहे. त्यामुळे नदीपात्रातला रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे.