अजित घस्ते
पुणे : अक्षय तृतीयेनंतर मार्केट यार्डाच्या फळ बाजारात आवक वाढल्यामुळे आंब्यांच्या दरात पन्नास टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. सध्या बाजारपेठेत उत्तम दर्जाचा आंबा ४०० ते ६०० रुपये डझन दराने उपलब्ध असल्याची माहिती आंबा व्यापाऱ्यांनी दिली. मागील आठवड्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याचे दर गगनाला भिडले होते. सण संपताच शुक्रवारी मागणीच्या तुलनेत आंब्याची आवक दुपटीने वाढल्याने दरातही निम्म्याने घसरण झाली.
रविवारी कोकण, कर्नाटकासह इतर ठिकाणांहून आणखीन आवक वाढण्याची शक्यता आंबा व्यापारी युवराज काची यांनी व्यक्त केली. मागील आठवड्यात ७ ते ८ हजार पेटी आवक असणारा आंबा आता १५ ते १८ हजार पेट्यांवर पोहोचला आहे. त्यात कच्चा आणि तयार आंब्यांचा समावेश आहे. बहुतांश हापूस, पायरी, केशर, तोतापुरी, लालबाग या जातींच्या आंब्यांचे भाव निम्म्यावर आले आहेत.
दरात ५० टक्क्यांची घसरण
गेल्या आठवड्यापर्यंत ८०० ते १२०० रुपये डझन मिळणारा हापूस आंबा आता निम्म्या दराने मिळत आहे. ४०० ते ५०० रुपये डझनापर्यंत भाव खाली आल्याने सामान्य ग्राहकांचा कल आंबाखरेदीसाठी वाढला आहे. हापूसबरोबर, पायरी आणि इतर स्थानिक जातींच्या आंब्यांच्या दरातही घसरण झाली असून, कोकणचा राजाही सामान्यांचा आवाक्यात आला आहे.
चव, गंध, त्वचा, आकारानुसार फरक
कोकण हापूस : या आंब्याची त्वचा अत्यंत पातळ आणि गुळगुळीत असते. पिकल्यावर हा आंबा केशरी-पिवळ्या रंगाचा दिसतो. जास्त डाग किंवा सुरकुत्या नसतात. कोकण हापूसचा सुगंध अतिशय तीव्र आणि मनमोहक असतो. आंबा खोलीत एका कोपऱ्यात ठेवला तरी पूर्ण घरभर त्याचा वास दरवळतो. कोकण हापूस आंबा खालच्या बाजूने थोडा गोल आणि सुबक असतो. कोकण हापूस आंब्याची किंमत उत्पादन खर्च आणि गुणवत्तेमुळे नेहमी कर्नाटक आंब्यांपेक्षा जास्त असते.
कर्नाटक हापूस : याची त्वचा कोकण हापूसच्या तुलनेत थोडी जाड असते. याचा रंग गडद पिवळा किंवा काही वेळा हिरवट-पिवळा असतो. यावर बारीक पांढऱ्या रंगाचे ठिपके अधिक ठळकपणे दिसू शकतात. हा कोकण आंब्याच्या तुलनेत खायला कमी गोड असतो. कर्नाटक हापूस याचा सुगंध खूप सौम्य असतो. आंबा नाका जवळ नेल्याशिवाय त्याचा वास सहसा जाणवत नाही. कर्नाटक हापूस हा आकाराने थोडा लांबट आणि खालच्या बाजूला टोकदार असतो.
आवक वाढली, दर उतरले
अक्षय तृतीयेपर्यंत रत्नागिरी आणि देवगड हापूसची टंचाई जाणवत होती. मात्र, आता बागांमधून आंबा काढणीला वेग आला आहे. मार्केट यार्डात दररोज १५ ते १८ हजार पेट्यांची आवक होत आहे. कोकण हापूस आंबा सणापूर्वी ८०० ते १२०० रुपये डझन असलेला हापूस आता ४०० ते ७०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.
बाजारपेठेतील आंब्यांच्या दराची स्थिती
आंब्याचा प्रकार : सध्याचे दर : मागील आठवड्यातील दर
कोकण हापूस (४ ते ५ डझन) १५०० ते ४५०० : २५०० ते ७०००कर्नाटक हापूस (४ ते ५ डझन ) १००० ते १५०० : २,५०० ते ३,५००
केशर (प्रति किलो) ६० ते ७० : ९० ते १००
लालबाग : (प्रति किलो) ५० ते ६० : ९० ते १२०तोतापुरी : (प्रति किलो) २५ ते ३० : ४० ते ६०
अक्षय तृतीयेनिमित्त दर तेजीत होते. आता दर कमी झाल्याने ग्राहकांची गर्दी झाली. सणानंतर दरवर्षी आवक वाढते, पण यंदा आवक दुप्पट झाली आहे. जो आंबा ८०० रुपयांत एक डझन होता, तो आता ४०० रुपयांवर आला आहे. मागील आठवड्यात आवक ७ ते ८ हजार होती. आता तीच आवक १५ ते १८ हजारांवर गेल्याने भाव कमी झाले आहेत. पुढील १५-२० दिवस आंब्यांचे दर स्थिर राहतील, ज्यामुळे ग्राहकांना मनसोक्त आस्वाद घेता येईल. - युवराज काची, आंबा आडते, मार्केट यार्ड.
कोकण हापूस बरोबर कर्नाटक आंब्यांची आवक वाढल्यामुळे घाऊक बाजारासोबतच किरकोळ बाजारातही आंब्याच्या किमतीत मोठी घट झाली आहे. आंब्याचे भाव कमी होताच मार्केट यार्डात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. कर्नाटक आंब्याला मागणी वाढली आहे आहे. येत्या रविवारीही आंबा खरेदीसाठी गर्दी होईल. - रोहन उरसळ, कर्नाटक आंबा आडते.
Web Summary : Mango prices plummet post-Akshay Tritiya due to increased supply. Hapus now at ₹400-600/dozen, benefiting consumers. Both Kokan and Karnataka varieties see price drops, making mangoes accessible. Increased market arrivals expected to stabilize prices.
Web Summary : आवक बढ़ने से अक्षय तृतीया के बाद आम के दाम गिरे। हापुस अब ₹400-600/दर्जन, उपभोक्ताओं को लाभ। कोंकण और कर्नाटक दोनों किस्मों के दाम घटे, जिससे आम सुलभ हो गए। बाजार में आवक बढ़ने से कीमतों के स्थिर रहने की उम्मीद।