झेरोधाचे सह-संस्थापक नितीन कामथ यांनी लहान मुलांच्या वागणुकीवर आणि मेंदूच्या विकासावर होणाऱ्या स्क्रीन टाईमच्या वाढत्या प्रभावाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. नुकत्याच केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी इशारा दिला की, जरी डिजिटल उपकरणं पालकांना त्यांचं वेळापत्रक सांभाळण्यास मदत करत असली, तरी मुलांमध्ये ती लॉग टर्म डिपेन्डेन्सी निर्माण करू शकतात.
कामथ यांनी सांगितलं की, हा विषय त्यांच्यासाठी पर्सनली खूप जास्त महत्त्वाचा आहे. कारण त्यांचा मुलगा अशा शाळेत शिकतो जिथे डिजिटल उपकरणांना परवानगी नाही आणि घरी देखील त्याचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटांपुरता मर्यादित आहे. एवढी मर्यादा असूनही मुलं शॉर्ट-फॉर्म डिजिटल कंटेंटकडे (उदा. रील्स) किती लवकर आकर्षित होतात, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
"स्क्रीन टाईम दिवसाला ३० मिनिटं"
कामथ यांनी लिहिलं, "बहुतेक पालकांसाठी डिजिटल उपकरणं ही एक 'पेसिफायर' (मुलांना शांत करण्याचं साधन) बनली आहेत. मुलांना शांत ठेवण्याचा हा एक मार्ग आहे आणि ते समजण्यासारखं आहे, परंतु यामुळे मुलांना एक प्रकारचं व्यसन लागतं किंवा ते त्यावर अवलंबून राहतात. कियानच्या (मुलाच्या) शाळेत कोणत्याही डिजिटल उपकरणाला परवानगी नाही आणि घरी आम्ही स्क्रीन टाईम दिवसाला ३० मिनिटांपर्यंत मर्यादित ठेवतो. तरीही रील्स आणि क्लिप्सचं व्यसन इतकं जबरदस्त आहे की, मी त्याला अनेकदा तेच पाहताना पकडतो."
मागील पिढ्यांच्या तुलनेत मागे
आपल्या पोस्टसोबत कामथ यांनी Cognitive Neuroscientist जेरेड कोनी होर्व्हाथ यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तरुण पिढीच्या शिकण्याच्या क्षमतेत होत असलेल्या घसरणीवर भाष्य करण्यात आलं आहे. होर्व्हाथ यांच्या मते, आजची मुलं शिक्षणात जास्त वेळ घालवत असूनही एकाग्रता, स्मरणशक्ती, साक्षरता आणि निर्णय घेण्याची क्षमता या बाबतीत मागील पिढ्यांच्या तुलनेत मागे पडत असल्याचं दिसून येत आहे.
ऑनलाईन चर्चा सुरू
याचा संबंध शिक्षण आणि दैनंदिन जीवनातील डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराशी जोडला आहे. सतत स्क्रीनच्या संपर्कात राहिल्यामुळे मुलांना अनेक गोष्टी नीट समजत नाहीत. कामथ यांच्या या पोस्टवर ऑनलाईन चर्चा सुरू झाली आहे. एका युजरने सहमती दर्शवत लिहिलं, "पूर्णपणे सहमत. दोन दशकांपूर्वी मोकळ्या वेळेला कंटाळवाणं मानलं जात नसे. आजचे 'हाय प्रॉडक्टिव्हिटी' पालक आपल्या मुलांच्या कॅलेंडरमधील प्रत्येक मिनिटाचं व्यवस्थापन करू इच्छितात. आपण घरात जणू 'ह्युमनॉइड्स' तयार करत आहोत."
स्क्रीन हा पालकांसाठी एक सोपा मार्ग
दुसऱ्या एका युजरने कमेंट केली, "ही स्क्रीन-टाईमची समस्या नसून एकाग्रतेची समस्या आहे. आपण कंटाळ्याची जागा डिस्ट्रॅक्शनने भरून काढली आहे आणि जिथे क्रिएटिव्हिटी खऱ्या अर्थाने सुरू होते, ती मोकळी जागा आपण गमावली आहे." मुलांची सतत काळजी न करता स्वतःसाठी थोडा वेळ मिळवण्यासाठी स्क्रीन हा पालकांसाठी एक सोपा मार्ग बनल्याचं अनेकजण म्हणत आहेत.
Web Summary : Zerodha's Nithin Kamath worries about the impact of even limited screen time on children. Despite restricting his son to 30 minutes daily and a device-free school, he notices the allure of short-form content and its effect on focus and learning.
Web Summary : जेरोधा के नितिन कामथ ने बच्चों पर स्क्रीन टाइम के प्रभाव को लेकर चिंता जताई। बेटे का स्क्रीन टाइम 30 मिनट तक सीमित रखने के बावजूद, वह शॉर्ट-फॉर्म कंटेंट के आकर्षण और सीखने पर इसके प्रभाव को लेकर चिंतित हैं।