अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळण्यासाठी पाकिस्तानात होणाऱ्या 'पीस टॉक'ला डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा सुरुंग लावला आहे. ट्रम्प यांनी आपले विशेष दूत स्टीव विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांचा नियोजित पाकिस्तान दौरा तडकाफडकी रद्द केला आहे. "केवळ चर्चा करण्यासाठी १८ तासांचा विमान प्रवास करून पाकिस्तानात जाण्यात काहीच अर्थ नाही," असे म्हणत ट्रम्प यांनी इराणला थेट अमेरिकेशी संपर्क साधण्याचे आव्हान दिले आहे.
'अमेरिकाच पावरफुल, फोन उचला अन् बोला'
फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. "इराणसोबतच्या या संघर्षात सर्व निर्णायक अधिकार आणि शक्ती अमेरिकेच्या हातात आहे. त्यामुळे आमच्या प्रतिनिधींनी इस्लामाबादला जाण्याची गरज नाही. इराणला जर खरोखरच शांतता हवी असेल, तर ते कधीही आम्हाला फोन करू शकतात. तिथं जाऊन १८ तास प्रवासाचा वेळ घालवून निरर्थक गप्पा मारण्यात मला रस नाही," असे ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले.
इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांची ओमानकडे धाव
एकीकडे ट्रम्प यांनी दौरा रद्द केला असतानाच, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी चर्चा करून ओमानकडे रवाना झाले आहेत. अराघची यांनी अमेरिकेशी चर्चा करण्यासाठी चक्क १० अटींची यादीच समोर ठेवली होती. मात्र, इराणने सुरुवातीपासूनच अमेरिकेशी थेट संवाद साधण्यास नकार दिला होता.
अराघची यांच्या दौऱ्याचे गुढ कायम
जर इराणला अमेरिकेशी चर्चाच करायची नव्हती, तर अराघची इस्लामाबादमध्ये का पोहोचले? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. यावर इराणने स्पष्ट केले की, अराघची यांचा दौरा हा द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करण्यासाठी होता, अमेरिकेसाठी नाही. "धमकी आणि दबावाच्या वातावरणात आम्ही अमेरिकेशी कोणतीही चर्चा करणार नाही," असा पवित्रा इराणने घेतला आहे. अराघची आता ओमान आणि त्यानंतर मॉस्कोला जाणार असून, तिथे ते काय भूमिका मांडतात याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
पाकिस्तानचे प्रयत्न अपयशी?
दोन्ही कट्टर शत्रूंना एकाच टेबलावर आणण्यासाठी पाकिस्तानने गेल्या काही दिवसांपासून मोठे प्रयत्न केले होते. इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा आणि लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. मात्र, ट्रम्प यांच्या एका निर्णयाने पाकिस्तानचे हे मध्यस्थीचे प्रयत्न तूर्तास तरी अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
Web Summary : Trump abruptly canceled his envoys' Pakistan trip for peace talks, urging Iran to contact the US directly. He dismissed the need for travel, asserting American power and offering a direct line for dialogue, while Iran's foreign minister seeks talks elsewhere.
Web Summary : ट्रम्प ने शांति वार्ता के लिए अपने दूतों की पाकिस्तान यात्रा रद्द कर दी, ईरान से सीधे अमेरिका से संपर्क करने का आग्रह किया। उन्होंने यात्रा की आवश्यकता को खारिज कर दिया, अमेरिकी शक्ति का दावा किया और बातचीत के लिए एक सीधी रेखा की पेशकश की, जबकि ईरान के विदेश मंत्री अन्यत्र वार्ता करना चाहते हैं।