हडपसर रुग्णालय बाॅम्ब प्रकरण; गुप्तरोगाच्या उपचारासाठी कट रचणाऱ्या आरोपीला ७ दिवसांची पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 17:50 IST2026-05-16T17:50:40+5:302026-05-16T17:50:54+5:30
काही दिवसांपूर्वी हडपसरमधील उषाकिरण रुग्णालयातून आरोपीला गुप्तरोग असल्याचे निदान झाल्याचे सांगण्यात आले. उपचारासाठी सुमारे ७ लाख रुपये खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते

हडपसर रुग्णालय बाॅम्ब प्रकरण; गुप्तरोगाच्या उपचारासाठी कट रचणाऱ्या आरोपीला ७ दिवसांची पोलीस कोठडी
पुणे: हडपसर परिसरात उषाकिरण रुग्णालयात बॉम्बसदृश वस्तू ठेवणाऱ्या आरोपीला दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नागपूर रेल्वेस्थानक परिसरातून अटक केली. त्याने हे कृत्य दहशतवादी दृष्टिकोनातून केलेले नसून, गुप्तरोगाच्या उपचारासाठी सात लाख रुपयांची गरज असल्याने आरोपीने रुग्णालय प्रशासनाकडून उपचाराच्या खर्चासाठी खंडणी उकळण्यासाठी हा संपूर्ण कट रचल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. दरम्यान, शनिवारी आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवाजी राम राठोड (वय ३०, रा. पाण्याची टाकीजवळ, कवठे, जुने सोलापूर, रा. मांजरी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला शुक्रवारी रात्री पुण्यात आणले आणि शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
आरोपी हा मूळचा सोलापूरचा असून, त्याचे मांजरी परिसरात ड्रेसचे छोटेसे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी हडपसरमधील उषाकिरण रुग्णालयात उपचारासाठी गेला होता. त्याला गुप्तरोग असल्याचे निदान झाले होते. उपचारासाठी सुमारे सात लाख रुपये खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने एवढी मोठी रक्कम उभी करणे त्याला शक्य नव्हते. याच कारणातून त्याने रुग्णालय व्यवस्थापनाला धमकावून पैसे उकळण्याचा कट आखल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या घटनेचा दहशतवादी कृत्याशी कोणताही संबंध नाही. त्याने घरीच पाइप वापरून बॉम्बसारखा प्रकार बनवला होता. त्याने रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात टाइमर लावलेली बॉम्बसदृश वस्तू ठेवली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच एकच खळबळ उडाली. या घटनेची पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली. बॉम्बची अफवा पसरल्यानंतर पोलिस रुग्णालयात आले, त्यावेळी पोलिस काय करतात? हे आरोपी लांबून बघत होता. बॉम्ब लावल्यानंतर आरोपीने दाढी केली आणि परत रात्री ११ पर्यंत रुग्णालय परिसरात फिरत होता. गुरुवारी रात्री पोलिसांचे पथक मांजरीत दाखल झाले. पोलिस त्याच्या घरापर्यंत पोहोचले, त्याच्या पंधरा मिनिटांपूर्वी तो घरातून निघून गेला होता, अशी माहिती त्याची बायको आणि मामाने पोलिसांना दिली. आरोपी हावडाला पळून जाण्याचा विचारात होता. त्याची बहीण नेपाळला असल्याने तो तिकडे पळून जाणार होता. सीसीटीव्हीद्वारे आरोपीची ओळख पटली असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
यू-ट्यूबवर बघून तयार केला बॉम्ब
आरोपीने यू-ट्यूबवर बघून बॉम्ब बनवण्याचे शिकून घेतले. त्याने २० रुपयांचा पाइप, १६० रुपयांचे घड्याळ हे सर्व साहित्य ऑनलाइन मागविले. त्यानंतर हार्डवेअर दुकानातून तार आणून १५०-२०० रुपयात बॉम्बसदृश आयटम बनवला. बॉम्ब चिकटत नसल्याने तो डबल साईड पडण्यासाठी पुन्हा हार्डवेअरच्या दुकानात गेला. तिथे त्याने पंधरा रुपयांचे ऑनलाइन पेमेंट केले असल्याची माहिती समोर आली आहे.