Baramati Bypoll Election 2026: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 11:04 IST2026-04-21T11:04:22+5:302026-04-21T11:04:35+5:30
Baramati Bypoll Election 2026: मतदानासाठी आवश्यक सुट्टी अथवा सवलत न दिल्यामुळे कर्मचारी मतदानापासून वंचित राहिल्यास, संबंधित आस्थापनांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा

Baramati Bypoll Election 2026: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर
बारामती: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र विधानसभेच्या २०१-बारामती मतदारसंघासाठी दि. २३ एप्रिल २०२६ रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भय व सुलभरीत्या बजावता यावा, यासाठी संबंधित मतदारांना भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
या आदेशानुसार, बारामती मतदारसंघातील मतदार असलेले कामगार, अधिकारी व कर्मचारी हे कामानिमित्त मतदान क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना मतदानाच्या दिवशी पगारी सुट्टी देणे बंधनकारक राहणार आहे. सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना लागू राहील. यामध्ये खासगी कंपन्या, दुकाने, हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे, शॉपिंग मॉल्स, आयटी कंपन्या तसेच विविध व्यापारी व औद्योगिक आस्थापनांचा समावेश आहे. दरम्यान, अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास, संबंधित कर्मचाऱ्यांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे आवश्यक राहील. याची जबाबदारी संबंधित आस्थापना मालकांवर असेल. मतदानासाठी आवश्यक सुट्टी अथवा सवलत न दिल्यामुळे कर्मचारी मतदानापासून वंचित राहिल्यास, संबंधित आस्थापनांविरुद्ध प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.